केएससीए धारवाड झोन फर्स्ट डिव्हिजन क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागीय फर्स्ट डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लब अ संघाने एसडीएमसीए ब धारवाड संघाचा 8 गडय़ानी पराभव केला. 29 धावात 4 बळी घेत शुभम गौंडाडकर व 89 धावांची खेळी करीत स्वप्निल हेळवे यांनी लक्षवेधी प्रदर्शन केले.
केएससीए ऑटोनगर येथील क्रिकेट स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या सामन्यात एसडीएमसीए ब धारवाड संघाने 37.2 षटकात सर्व बाद 143 धावा केल्या. त्यात सचिन कूलीने 47, आदर्श हिरेमठने 26, किरण बडिगेरने 19, मानस एम. एस.ने 16 धावा केल्या. बेळगाव स्पोर्ट्स क्लब अ संघातर्फे शुभम गौंडाडकरने 29 धावात 4, स्वयम आप्पण्णावरने 37 धावात 2, आकाश कटांबळेने 45 धावात 2 तर अमर घाळीने 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरात बेळगाव स्पोर्ट्स क्लब अ संघाने 22.4 षटकात 2 बाद 144 धावा करून सामना 8 गडय़ानी जिंकला. त्यात सलामीच्या स्वप्निल एळवेने 3 षटकार, 13 चौकारासह 89, शुभम नेसरीकरने 34, ओंकार वेर्णेकरने नाबाद 10 धावा केल्या. धारवाडतर्फे आदर्श हिरेमठ व मानस एम. एस. यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.