महिन्यात 13 हजार प्रवाशांचा विमानप्रवास : कमी तिकीटदरामुळे प्रवासीसंख्येत वाढ
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव विमानतळावरून प्रवास करणाऱयांची संख्या दररोज वाढताना दिसत आहे. डिसेंबर 2020 मध्ये बेळगाव-हैदराबाद या मार्गावर सर्वाधिक प्रवाशांनी प्रवास केल्याचे नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे. एकूण 13 हजार प्रवाशांनी हैदराबाद शहराचा प्रवास केल्याचे दिसत आहे. प्रवाशांची संख्या वाढल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
हैदराबाद शहरात अनेक आयटी कंपन्या असल्याने प्रवाशांची नेहमी ये-जा असते. हैदराबादनंतर बेंगळूर, मुंबई, कडाप्पा, म्हैसूर, पुणे, तिरुपती, इंदूर व शेवटी सुरत शहराला सर्वाधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे. डिसेंबर महिन्यात विमानतळाने 30 हजारांचा टप्पा पार केला होता. जानेवारीमध्ये चेन्नई व नाशिक या शहरांची भर पडली आहे. त्यामुळे प्रवासी संख्या अजून वाढण्याची चिन्हे आहेत.
हैदराबादला दररोज विमाने बेळगावमधून हैदराबादला दररोज 3 विमाने उपलब्ध होत आहेत. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन या मार्गावर फेऱया वाढविण्यात आल्या आहेत. सध्या बेळगावमधून इंडिगो, स्पाईसजेट, ट्रुजेट कंपन्या या मार्गावर सेवा देत आहेत. बेळगावमधून लष्करी जवान मोठय़ा प्रमाणात हैदराबादमार्गे दिल्लीचा प्रवास करीत आहेत. अत्यंत कमी तिकीट दरात हैदराबादपर्यंतचा प्रवास करता येत असल्याने प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे.