वार्ताहर/ किणये
तालुक्याच्या पश्चिम भागातील बेळगुंदी ग्राम पंचायतीमध्ये सर्वाधिक चुरशीने मतदान झाले असून या ग्राम पंचायतीमध्ये 90.77 टक्के मतदान झाले आहे. बेळगुंदी ग्राम पंचायतीमध्ये बेळगुंदीसह सोनोली व बोकनूर या गावांचा सहभाग असून या तिन्ही गावांमध्ये निवडणूक अगदी शांततेत पार पडली. ग्राम पंचायतीमध्ये एकूण 19 जागा असून यामधील दोन उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. यामुळे उर्वरित 17 जागांसाठी मतदान झाले आहे. तीन गावामध्ये मिळून सात वॉर्ड आहेत. या वॉर्डामधून 17 जागांसाठी एकूण मतदार 5638 यापैकी 5118 इतके मतदान झाले आहे.
सोनोली गावातील वॉर्ड क्रं. 5 मधून एकाची बिनविरोध तसेच बोकनूर गावातील वॉर्ड क्रमांक 7 मधील एका महिलेची बिनविरोध निवड झाली आहे. यामुळे 56 उमेदवारांमधील दोघा जणांची बिनविरोध निवड झाली असल्यामुळे 54 उमेदवार रिंगणात आहेत. या 54 उमेदवारांचे भवितव्य आज मतदान पेटीत बंद झाले आहे.
बेळगुंदी गावातील चार वॉर्डामधील 3207 मतदानापैकी 2842 मतदान झाले असल्याने बेळगुंदी गावात 88.61 टक्के मतदान झाले आहे.
सोनोली गावात दोन वॉर्ड आहेत. यामध्ये एकटय़ाची बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित 3 उमेदवारांसाठी वॉर्ड क्रमांक 5, 9, 6 मधून 93.75 टक्के मतदान झाले आहे. दोन्ही वॉर्डामध्ये चुरशीने मतदान झाले.
बोकनूर गावातील वॉर्ड क्रमांक 7 मध्येही चुरशीचे मतदान झाले. एकूण 973 मतदानापैकी 909 मतदान झाले असून बोकनूर गावात 93.42 टक्के मतदान झाले आहे. मतदान झाल्यानंतर उमेदवार व त्यांचे समर्थक मतदानाच्या आकडेवारीचे गणित करीत होते.