वार्ताहर / किणये
बेळगुंदी येथील तीन दुकाने फोडली. फर्निचर हॉटेल व फास्टफुड दुकानातील साहित्य व रोख रक्कम चोरटय़ांनी लांबविली. सदर चोरीचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला. ऐन लॉकडाऊनच्या रविवारी रात्री चोरी झाली असल्याचा संशय स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे. एकाच रात्री तीन दुकाने फोडली असल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
बेळगुंदी रोड येथील बिजगर्णी क्रॉस, हनुमाननगर या ठिकाणी असलेल्या तीन दुकानांमध्ये चोरीचा प्रकार घडला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सोमवारी सकाळी वडगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.
इमारतीवरील पत्रे काढून चोरटय़ांनी दुकानात प्रवेश केला. नामदेव धोंडिबा देवळी यांच्या फास्टफुडमधील दोन गॅसच्या टाक्या चोरी करण्यात आल्या आहेत. राहूल गुंडू जाधव यांच्या हॉटेलमधील बिस्किट, बेसन, तेल डबे आदी साहित्याची चोरी केली आहे. तसेच आपल्या दुकानाच्या गल्यातील रोख पाच हजार रुपयेही लांबविली असल्याची माहिती राहूल जाधव यांनी दिली आहे.
कल्लाप्पा रमेश पाटील यांच्या स्टिल फर्निचरच्या दुकानातील आठ डबे लांबविले आहेत. त्यामुळे त्यांचे सुमारे 60 ते 70 हजाराचे नुकसान झाले आहे. कोरोना लॉकडाऊनच्या संकटामुळे छोटय़ा मोठय़ा व्यावसायिकांवर आधीच उपासमारीची वेळ आली आहे. असे असताना बेळगुंदी हनुमाननगर हे छोटे व्यावसायिक अडचणीत आले आहेत.
मुख्य रस्त्याच्या बाजूलाच असलेल्य़ा तीन दुकानांमध्ये चोरी झाली असल्याने सकाळी घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. वडगाव ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस चोरीचा अधिक तपास करीत आहेत.