वार्ताहर/ किणये
बेळगुंदी शिवारात मंगळवारी वाघसदृश प्राणी दिसल्यामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली असून शेतकरीवर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या वाघसदृश प्राण्याचा शोध घेण्यासाठी वनखात्याच्या अधिकाऱयांनी बुधवारी बेळगुंदी परिसरात शोधमोहीम राबविली आहे.
वाघसदृश प्राणी निदर्शनास आलेल्या सर्व शेत-शिवाराची पाहणी वनखात्याचे संरक्षण अधिकारी शिवानंद मगदूम, उपवनसंरक्षण अधिकारी रमेश गिरेपन्नवर, जयसिंग रजपूत, राहुल बोंगाळे आदींनी केली.
वाघसदृश प्राणी निदर्शनास आला असल्याची माहिती काही शेतकऱयांनी दिल्यानंतर वनखात्याच्या पथकाने बुधवारी सकाळी व सायंकाळी अशी दोनवेळा या भागाची पाहणी केली. मात्र, बुधवारी उशिरापर्यंत कोणताही सुगावा लागला नाही. किंवा ठसेही आढळून आले नाहीत, अशी माहिती अधिकारी जयसिंग रजपूत यांनी दिली आहे. शोधमोहीम पुन्हा गुरुवारीही राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्या शिवारात वाघसदृश प्राणी दिसला आहे त्या ठिकाणी बेळगुंदी गावातील काही शेतकऱयांनी ये-जा केली आहे. त्यामुळे वाघसदृश प्राण्याचे ठसेही व्यवस्थितपणे दिसले नाहीत, अशी माहिती रजपूत यांनी दिली.
बेळगुंदी शिवारातून मार्कंडेय नदीच्या काठावरून शिनोळी गावाकडे जाणारा कच्चा मार्ग आहे. या रस्त्यावरून घरी जाणाऱया ढेकोळी गावच्या एका कामगाराला सदर वाघसदृश प्राणी दिसला. मंगळवारी सदर प्राण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामुळे बेळगुंदी, सोनोली, कुद्रेमनी व शिनोळी भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
जागृतीसाठी गावात दिली दवंडी
नागरिकांमध्ये जागृती व्हावी यासाठी बेळगुंदी गावात मंगळवारी रात्री दवंडी देऊन सदर शिवारात कोणीही जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले. या शिवारात कोबी, फ्लॉवर, मका आदींसह विविध प्रकारची भाजीपाला पिके शेतकऱयांनी घेतली आहेत. ऊस लागवडीचा हंगाम असल्याने वाघसदृश प्राण्याची भीती असली तरीही शेत-शिवारात जावेच लागते. कारण अशा प्राण्यांच्या भीतीपोटी आम्ही शेती करणे थांबवू शकत नाही, असेही काही शेतकऱयांनी सांगितले.
बेळगुंदी गावातील बहुतांशी शेतकऱयांची शेती मार्कंडेय नदीकाठालगतच आहे. यामुळे भाजीपाला पिकांची देखभाल करण्यासाठी शेतावर जाणे गरजेचे आहे. काजू बागायतीही आहेत. सदर प्राण्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे.
वनखात्याने कसली कंबर
शेतकऱयांमध्ये निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी वनखात्याच्या अधिकाऱयांनी कंबर कसली आहे. शोधमोहीम गुरुवारीही जारी ठेवण्यात येणार असून सदर वाघसदृश प्राणी शिनोळी परिसरातील डोंगराळ भागात गेला असावा, असा संशयही वनखात्याचे अधिकारी रजपूत यांनी व्यक्त केला आहे.
बुधवारी वनखात्याच्या अधिकाऱयांसमवेत गावातील मल्लाप्पा ढेकोळकर, महेश कोकितकर, नामदेव गुरव, शट्टुप्पा चव्हाण, सागर पाटील आदींनी पाहणी करून अधिकाऱयांना सहकार्य केले.