सिंधुदुर्गातून 75 एसटी गाडय़ा पाठविणार : सोबत चालक, वाहकही
प्रतिनिधी / कणकवली:
एसटी महामंडळाने पूर्ण क्षमतेने प्रवासी सेवा सुरू केली असली, तरीही एसटीला अद्याप प्रवाशांचा पुरेसा प्रतिसाद मिळत नाही. आता रा. प. महामंडळाचा दैनंदिन चालनासाठी बेस्ट उपक्रमाला एसटीच्या बसेस पुरविण्याचा निर्णय झाला असून सिंधुदुर्गमधून यासाठी 75 बसेस 1 नोव्हेंबरपासून देण्यात येणार आहेत. यासाठी प्रत्येक बससाठी दोन चालक व दोन वाहकही पाठविण्यात येणार आहेत.
या बसेस 2 नोव्हेंबरपासून बेस्टच्या उपक्रमात सहभागी होणार आहेत. या बसेससाठीचा चालनीय कालावधी पहाटे 6 ते रात्री 12 पर्यंत असणार आहे. प्रत्येक बससोबत दोन चालक व दोन वाहक पाठवायचे असून त्यांची आठवडा सुट्टी तात्पुरत्या स्वरुपात रविवार असणार आहे. पाठविण्यात येणारे चालक, वाहक हे निर्व्यसनी, होतकरू, शक्यतो मुंबई शहराची व उपनगराची माहिती असलेले तसेच 55 वर्षांच्या आतील असावेत, असेही रा. प. महामंडळाकडून स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
या विभागाचे विभागीय वाहतूक अधिकारी यांच्यासमवेत प्रत्येकी दोन मार्ग तपासणी जीप तसेच एक सहाय्यक वाहतूक अधीक्षक, एक वाहतूक निरीक्षक, दोन वाहतूक नियंत्रक व प्रत्येकी दोन लिपीक पाठविण्यात यावेत. तसेच मार्ग बिघाड दुरुस्तीसाठी प्रत्येकी एक दुरुस्ती वाहन आवश्यक त्या सर्व सुटय़ा भागांसह पाठवायचे आहे. पथकात आवश्यक त्या प्रमाणात यांत्रिक कर्मचारी सोबत पाठवायचे आहेत. पाठविण्यात येणाऱया बसेसच्या पार्किंगची तसेच चालक, वाहकांच्या निवास व भोजनाची व्यवस्था रा. प. महामंडळामार्फत करण्यात येणार असल्याचे रा. प. महामंडळाच्या महाव्यवस्थापक (वाहतूक) यांनी कळविले आहे.