ऑनलाईन टीम / मुंबई :
भांडूप गाढव नाका परिसरामध्ये बेस्ट चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर एक जण जखमी झाला आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करुन त्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 605 क्रमांकाची ही बस भांडुप रेल्वे स्थानकावरून टेंभीपाडा परिसराकडे जात होती. भांडुपचा गाढव नाका परिसरामध्ये भरधाव वेगात असताना बेस्ट चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि या बेस्ट बसने रस्त्यावरून जात असलेल्या दोन नागरिकांना धडक दिली. या दुर्देवी घटनेत 82 वर्षाचे कुंडलिक भगत यांचा जागीच मृत्यू झाला. तर 65 वषीय रवींद्र तिवारी हे जखमी झाले आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर भांडुप पोलिसांनी बेस्ट चालकाला ताब्यात घेतले असून मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास भांडुप पोलीस करीत आहेत.