…म्हणे काळादिनाला परवानगी नाही, कोरोनाचे नियम पाळून राज्योत्सव मिरवणुकीस परवानगी
प्रतिनिधी /बेळगाव
मराठी बहुल भाग असलेल्या सीमाभागामध्ये मराठी भाषिकांना डिवचण्यासाठी मुठभर कन्नड संघटना बाहेरील कन्नड नागरिकांना बोलावून घेऊन राज्योत्सव साजरा केला जातो. राज्योत्सव साजरा करण्याबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. मात्र या बैठकीत राज्योत्सव साजरा करण्याबाबत चर्चा न करता म. ए. समितीच्या विरोधात गरळ ओकण्याचा प्रकार पुन्हा घडला आहे. यावरून म. ए. समिती आणि मराठी भाषिकांची भीती या कन्नड संघटनांच्या मुठभर कार्यकर्त्यांनी घेतल्याचे दिसून आले.
कार्यकर्त्यांनी यावेळी काळय़ा दिनाला परवानगी देऊ नये, अशी मागणी रेटून धरली. त्यामुळे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी म. ए. समितीला काळादिन पाळण्यास परवानगी देणार नाही, असे आश्वासन दिले. राज्योत्सव मात्र कोरोनाचे नियम पाळत साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत कशाप्रकारे राज्योत्सव साजरा करायचा याची चर्चा झाली नाही. कन्नड कार्यकर्त्यांनी केवळ या बैठकीमध्ये म. ए. समितीच्या विरोधात गरळ ओकून फुशारकी मारली.
राज्योत्सवाची बैठक की म. ए. समितीच्या विरोधातील बैठक हेच समजले नाही. प्रत्येक कन्नड कार्यकर्ता बोलण्यासाठी धडपडत होता. कोणतीही शिस्त नाही, काय बोलावे हे माहिती नाही. मात्र काहीतरी बोलून मोठेपणा मिळविण्याचा प्रयत्न या बैठकीत झाला. त्यामुळे काही कन्नड कार्यकर्त्यांनीच नाराजी व्यक्त केली. इतर सण चालतात. मात्र राज्योत्सवच्या या बैठकीत मोठी गर्दी करून कोरोनाचे नियम पायदळी तुडविल्याचे दिसून आले. बैठकीला जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, जि.पं. मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., आयुक्त रुदेश घाळी उपस्थित होते.