बैरुत :
लेबनॉनची राजधानी बैरुतमध्ये मंगळवारी संध्याकाळी झालेल्या स्फोटासाठी निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. अमोनियम नायट्रेटने भरलेले कार्गो मागील अनेक वर्षांपासून समुद्रकिनाऱयावर ठेवण्यात आले होते, परंतु सुरक्षेची कुठलीच व्यवस्था करण्यात आली नव्हती. अधिकाऱयांना अनेकदा इशारा दिल्यावरही ते हटविण्यात आले नव्हते असे तपास अधिकाऱयांनी म्हटले आहे.
2013 मध्ये रशियन जहाज जॉर्जियाच्या बटूमी येथून 2,750 मेट्रिक टन अमोनियम नायट्रेट घेऊन मोझाम्बिकसाठी रवाना झाले होते. एमव्ही रोसस या जहाजाची मालकी रशियन उद्योजकाकडे होती. हे जहाज ग्रीसमध्ये इंधन भरण्यासाठी थांबले होते. पैसे संपल्याने खर्च भरून काढण्यासाठी अतिरिक्त सामानाची वाहतूक करावी लागणार असल्याचे जहाजमालकाने सांगितले होते. याच कारणामुळे जहाज बैरुत येथे पोहोचले होते.
संबंधित जहाज लेबनॉनच्या सरकारने ताब्यात घेतले होते. जहाजमालकावर नियमांकडे डोळेझाक करणे आणि बंदराची थकबाकी न भरल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. हे जहाज म्हणजे तरंगता बॉम्ब असल्याचा इशारा लेबनॉनच्या कस्टम विभागाचे संचालक बदरी दहेर यांनी अनेकदा दिला होता. 2014 मध्ये या जहाजावरील अमोनियम नायट्रेटचे कंटेनर उतरवून बंदराच्या गोदामात ठेवण्यात आले होते. तेव्हापासून हे कंटेनर तेथेच पडून होते. अमोनियम नायट्रेटचा वापर प्रामुख्याने खतांच्या स्वरुपात आणि खाणकामात स्फोटासाठी केला जातो.
जर्मन मुत्सद्याचा मृत्यू
बैरुत येथील स्फोटात जर्मनीचा मुत्सद्दीही मारला गेला आहे. बचावपथकांनी मृतदेह बाहेर काढले असून ढिगाऱयाखाली अडकून पडलेल्या लोकांना वाचविले आहे. स्फोटातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयफेल टॉवरवरील रोषणाई बंद ठेवण्यात आली होती. तर पॅरिसच्या साकरे कोयूर बासिलिकाच्या बाहेर मेणबत्ती पेटवून एका संघटनेने दुःख व्यक्त केले आहे.