भोसेच्या यल्लमा यात्रेत ग्रामीण पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी / मिरज
तालुक्यातील भोसे येथील यल्लमा देवी यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यतीवर मिरज ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली. जिह्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंध असतानाही यात्रा आयोजित केल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय शामराव मलमे (वय 52), सुरज कुमार देवकाते (वय 22), गणेश प्रकाश जगदाळे (वय 28), अभिजीत सुरेश मोरे (वय 27), ऋषिकेश संजय मलमे (वय 25), चैतन्य सुरेश बंडगर (वय 26) आणि किरण नेमिनाथ वाळवे (वय 32, सर्व रा. भोसे, ता. मिरज) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नांवे आहेत.
भोसे येथे यल्लमा देवी यात्रा आयोजित केली होती. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा काळात कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम घेऊ नयेत, अशा सुचना पोलिस प्रशासनाने केल्या होत्या. असे असतानाही वरील सात जणांनी यल्लमा देवी मंदिराच्या पाठीमागील बाजूस बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले. या शर्यतीमध्ये आपलाच नंबर येण्यासाठी बैलांना निर्दयपणे मारहाण करण्यात येत होती. तसेच शर्यत पाहण्यासाठी अनेक ग्रामस्थांनी गर्दी केल्याने कोरोना नियमांचा भंग झाला होता.
पोलिसांनी शर्यतीस्थळी तात्काळ धांव घेऊन बैलगाडी शर्यत थांबविली. शर्यत आयोजित केलेल्या वरील सात जणांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात नोंद झाली आहे.