सातारा तालुका पोलिसांची कारवाई : अंगापूर येथे बेकायदा शर्यती
प्रतिनिधी /सातारा
उच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतीस बंदी घातलेली असताना देखील सातारा तालुक्यातील अंगापूर येथे अंगलाईनगरमधील माळावर बैलगाडी शर्यतींचे आयोजन करुन न्यायालयाच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सातजणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यावेळी बैलगाडी छकडा व सहा महिन्याचे बैल जातीचे वासरुही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांना अंगापूर येथे बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी यांना कारवाई करण्याची सूचना केली. पोलीस दलाचे पथक अंगापूर येथे गेले असता तेथील अंगलाईनगरमधील माळावर बैलगाडी शर्यती सुरु होत्या.
पोलीस पथकाला पाहताच बैलगाडी चालक, मालक, आयोजक पळून जावू लागले. मात्र, पोलिसांनी शर्यती भरवणारे आयोजक शुभम जयवंत निकम वय 22, रा. हेळगाव, ता. कराड, योगेश कृष्णात वारे रा. कालगाव, ता. कराड, विशाल दत्तात्रय वायदंडे रा. हेळगाव, ता. कराड, मनोज विलास केसरकर रा. अपशिंगे, ता. सातारा, गणेश हणमंत सूर्यवंशी रा. हेळगाव व आयोजक पप्पू हणमंत कणसे रा. अंगापूर, ता. सातारा यांना जागीच पकडले.
त्यांच्यावर प्राण्यांचा छळ प्रतिबंध कायद्यान्वये पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी डफळे यांनी तक्रार दिली असून या सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी पोलिसांनी योगेश वारे यांचा शर्यतीसाठी आणलेला छकडा व बैल तसेच शुभम निकम यांच्या ताब्यातील सहा महिने वयाचे वासरु ताब्यात घेतले आहे. या गुन्हय़ाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी करत आहेत.