वार्ताहर / बैलूर
येथील 25 ते 30 विद्यार्थ्यांना गेली तीन वर्षे कराटे क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षण देणाऱया सीआरपीएफ अधिकारी शाईन कुमार यांचा बैलूर ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी कराटे क्रीडा प्रकारात पारंगत झालेल्या विद्यार्थ्यांना बेल्ट वाटपाचा कार्यक्रम लक्ष्मण झांजरे यांच्या अध्यक्षतेखाली पार
पडला.
कार्यक्रमप्रसंगी जि. पं. माजी सदस्य लक्ष्मण बामणे, बैलूर ग्रा. पं. उपाध्यक्ष रविंद्र गुरव, बैलूर ग्रा. पं. माजी अध्यक्ष सिद्धाप्पा नाकाडी, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी लक्ष्मण झांजरे म्हणाले, आजचा विद्यार्थी उद्याचा जबाबदार नागरिक असल्याने सुदृढ शरीर कमवणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्या गावातील विद्यार्थ्यांना दिलेले कराटेचे प्रशिक्षण मोलाचे ठरणार आहे.
बेंगळूर येथील विजेत्यांचा सत्कार
यावेळी शाईन कुमार यांनी प्रशिक्षण दिलेल्या कराटेपटूंना बेल्टचे वाटप केले. तसेच बेंगळूर येथे झालेल्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविलेले ओमदीप कालकुंद्रीकर, शेखर गोवेकर, प्रांजल कालकुंद्रीकर यांना मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
तोराळी येथील कोब्रा कमांडो ट्रेनिंग सेंटरमध्ये अधिकारी पदावर कार्यरत असणारे शाईन कुमार हे मूळचे केरळचे. कामासाठी बैलूर येथे गेली तीन वर्षे वास्तव्यास आहेत. त्यांनी गेल्या तीन वर्षांत गावातील मुलांना कराटेचे मोफत प्रशिक्षण दिले आहे.
प्रांजल कालकुंद्रीकरला ब्लॅक बेल्ट
त्याचबरोबर मागील तीन वर्षापासून छत्रपती संभाजी हायस्कूलमधून प्रथम व द्वितीय येणाऱया विद्यार्थ्यांना रोख रक्कम देऊन गौरविले आहे. त्यांनी प्रशिक्षण दिलेल्या प्रांजल कालकुंद्रीकर हिने ब्लॅक बेल्ट मिळविल्याबद्दल स्वतःतर्फे लॅपटॉप भेट देऊन गौरविले आहे. अशा प्रकारे त्यांनी बैलूरच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. या त्यांच्या योगदानाबद्दल बैलूर ग्रामस्थांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमप्रसंगी संभाजी तुर्केवाडकर, सिद्धाप्पा रामू नाकाडी, भुजंग कणकुंबकर, संजय नाकाडी व ग्रामस्थ आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन छत्रपती संभाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. डी. पाटील यांनी केले.