वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एमसी मेरी कोम व अन्य दोघांना वगळता ऑलिम्पिकला जाणारे भारतीय बॉक्सर्स टेगिंसाठी पुढील आठवडय़ात इटली व फ्रान्सला प्रयाण करणार आहेत. 52 दिवसांच्या या दौऱयात टेनिंग कम स्पर्धा घेतली जाणार आहे. मेरी कोम मात्र तब्बेत बरी नसल्याने या दौऱयात सामील होणार नाही. त्याऐवजी ती दिल्लीतच सराव करणार आहे.
मेरी कोम सध्या डेंग्यूच्या आजारातून सावरत होत असून दोन आठवडय़ापासून तिला हा त्रास सुरू होता. यामुळे ती विदेश दौऱयावर जाऊ शकणार नाही. युरोपचा हा दौरा 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. ‘गेल्या दोन आठवडय़ापासून मला डेंग्यू झाल्याने बरे वाटत नव्हते. आता तब्बेतीत बरीच सुधारणा झाली असली तरी मी विदेश प्रवास करू शकणार नाही. दिल्लीत राहूनच मी सराव करणार आहे. पुढील वर्षापर्यंत कोव्हिड 19 ची लस उपलब्ध होऊ शकली तर विदेश प्रवास करू शकेन,’ असे 38 वर्षीय मेरी कोम म्हणाली. ऑलिम्पिकमध्ये ती दुसऱयांदा खेळणार आहे. एकूण 28 सदस्य युरोप दौऱयावर जाणार असून त्यात 10 पुरुष व 6 महिलांचा समावेश आहे. सरकारने या दौऱयाला मान्यता दिली असून त्यासाठी 1.31 कोटी रुपये खर्चही मंजूर केला आहे.
या ट्रेनिंग दौऱयात अमित पांघल, आशिष कुमार, सतीश कुमार, सिमरनजित कौर, लवलिना बोर्गोहेन, पूजा रानी या सहा जणांचा समावेश आहे. विकास कृष्णन सध्या अमेरिकेत ट्रेनिंग घेत आहे तर मनीष कौशिक दुखापतीतून सावरत आहे. इटलीतील असिसी येथे 15 ऑक्टोबर ते 5 डिसेंबरपर्यंत हा संघ सराव करणार आहे. याशिवाय 28 ते 30 ऑक्टोबर या अवधीत नॅन्टेस, फ्रान्स येथे होणाऱया ऍलेक्सिस व्हॅस्टाईन आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही ते भाग घेणार आहेत.