सेंट जोन्स (अँटिग्वा)
येथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत गुरुवारी खेळाच्या तिसऱया दिवशी बॉनेरच्या चिवट शतकामुळे यजमान विंडीजने इंग्लंडवर पहिल्या डावात 62 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. बॉनेरने शानदार शतक (123) झळकविले. दिवसअखेर विंडीजने पहिल्या डावात 9 बाद 373 धावा जमविल्या.
या कसोटीत इंग्लंडने पहिल्या डावात 311 धावा जमविल्यानंतर विंडीजने 4 बाद 202 या धावसंख्येवरून तिसऱया दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. अष्टपैलू होल्डर स्टोक्सच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 1 षटकार आणि 6 चौकारांसह 45 धावा जमविल्या. होल्डर आणि बॉनेर यांनी पाचव्या गडय़ासाठी 79 धावांची भागिदारी केली. बॉनेरने डिसिल्वाला साथीला घेत सहाव्या गडय़ासाठी 73 धावांची भर घातली. उपाहारावेळी विंडीजची स्थिती 5 बाद 271 अशी होती. बॉनेरने या कालावधीत आपले अर्धशतक पूर्ण केले. उपाहारानंतर इंग्लंडच्या लिचने डिसिल्वाला पायचीत केले. त्याने 1 चौकारासह 32 धावा जमविल्या. ओव्हरटनने जोसेफला 2 धावांवर झेलबाद केले तर रॉच चोरटी धाव घेण्याच्या नादात धावचीत झाला. त्याने 3 चौकारांसह 15 धावा जमविल्या. बॉनेर नवव्या गडय़ाच्या रूपात तंबूत परतला. लॉरेन्सने त्याला झेलबाद केले. बॉनेरने 355 चेंडूत 1 षटकार आणि 12 चौकारांसह 123 धावा जमविल्या. पेरमॉलच्या चिवट खेळीमुळे विंडीजला 350 धावांचा टप्पा ओलांडता आला. बॉनेर आणि पेरमॉल यांनी नवव्या गडय़ासाठी 46 धावांची भर घातली. दिवसअखेर पेरमॉल 3 चौकारांसह 26 धावांवर खेळत आहे तर सिलेसने अद्याप खाते उघडलेले नाही. विंडीजने इंग्लंडवर पहिल्या डावात 62 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळविली आहे. इंग्लंडतर्फे ओव्हरटन आणि स्टोक्स यांनी प्रत्येकी 2 तर वोक्स, वूड, लिच आणि लॉरेन्स यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड प. डाव- 100.3 षटकात सर्वबाद 311, विंडीज प. डाव- 157 षटकात 9 बाद 373 (बॉनेर 123, ब्रेथवेट 55, कॅम्पबेल 35, ब्लॅक वूड 11, होल्डर 45, डिसिल्वा 32, रॉच 15, पेरमॉल खेळत आहे 26, ओव्हरटन 2-85, स्टोक्स 2-42, वोक्स 1-88, वूड 1-45, लिच 1-79, लॉरेन्स 1-0).