प्रतिनिधी / सातारा :
साताऱ्यातील राष्ट्रीय महामार्गावरील बॉम्बे रेस्टारंट येथील पुलाखाली विविध प्रकारच्या मूर्ती विकणाऱ्या दोन राजस्थानी कुटुंबात घरगुती कारणातून तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये महिलांसह तीन-चार पुरुषही जखमी झाले असून, याप्रकरणी सातारा शहर पोलीस परस्परविरोधी तक्रारीनंतर दोन्ही कुटुंबातील 9 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत इराराम सौगाजी राठोड (वय 38, सध्या रा. बॉम्बे रेस्टारंट चौक पुलाखाली, मूळ रा. राजस्थान) यांनी तक्रार दिली आहे.
या तक्रारीनुसार, नंदू धनाजी सोलंकी याला पैसे दिले नाहीत याचा राग मनात धरुन इराराम याचा मुलगा कमलेश यास मारहाण करण्यात येत होती. ही भांडणे सोडवण्यास इराराम व त्याची पत्नी, भावजय सपना राठोड गेले असता त्यांना बांबूने, मूर्तीने व चाकूचा वापर करुन मारहाण झाली. ही मारहाण करणाऱ्या नंदू धनाजी सोलंकी, देव, बाबू, सोहन (पूर्ण नावे माहिती नाहीत) यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, याच भांडणातून धनाजी मन्नाजी सोलंकी यांचा मुलगा बाबू याचे लग्न परशुराम राठोड याच्या मुलीशी ठरले होते. ते करायचे नाही असे म्हणत राठोड कुटुंबातील सदस्यांनी नंदू सोलंकी याच्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन जखमी केले. तर धनाजी सोलंकी यांना देखील रॉडने मारहाण केल्याने ते जखमी झाले आहेत. याप्रकरणी इरा सौगा राठोड, कैलास सौगा राठोड, कमलेश धानाराम राठोड व जिवा परशुराम राठोड यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक शेख करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.