बुकींना मिळतेय अभय, पोलीस कारवाई दिखावू
प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरात मटका अड्डे खुलेआमपणे सुरु आहेत. बॉम्बे रस्टॉरंट पूल, प्रिती हॉटेलच्या पाठीमागे मोकळय़ा जागेत, कृष्णानगर येथे कॅनॉल लगत, पाटबंधारे विभागाच्या जागेत, खेड चौकात, वाढे फाटा परिसर आदी ठिकाणी मटक्याचे अड्डे जोरात सुरु आहेत. पोलिसांकडून वरवरची कारवाई केली जाते. ज्या दिवशी तक्रार येईल, बातमी येईल त्याच दिवशी कारवाई होते अन् त्यानुसार जुजबी कारवाई केली जाते. मटक्याच्या पावत्या दररोज दुपारी आणि संध्याकाळी फाटल्या जात आहेत. मटक्याचे अड्डे बंद करण्यात यावेत अशी मागणी होवू लागली आहे.
सातारा पोलिसांकडून मटक्याच्या अड्डय़ावर कारवाई केली जाते. परंतु कारवाई करुन गेल्यानंतर लगेच मटक्याच्या टपरीवर ओपन आणि क्लोजचे आकडे घेण्यासाठी दुसरा टीपर उभा राहतो. मटक्याचा अड्डा मात्र राजरोजपणे सुरु असतो. पोलिसांना हप्ते सुरु असल्याचे बिनदिक्कतपणे आकडे लावण्यासाठी येणाऱया बुकी सांगतात. त्यामुळे मटका अड्डे सातारा शहर व परिसरात झालेले आहेत. त्यामध्ये बॉम्बे रेस्टॉरंट परिसर, हॉटेल प्रितीच्या पाठीमागे, कृष्णानगर कॉलव्याच्या लगत एका शेडमध्ये, तसेच वाढे फाटा, तसेच शहरात पालिकेच्या समोर पाण्याच्या टाकीखाली, सातारा बसस्थानक परिसर, राजवाडा परिसर, मोळाचा ओढा आदी ठिकाणी मटका उघडपणे तर छुप्या पद्धतीने सुरु आहे. त्याच्यावर पोलिसांकडून कारवाई करुन मटक्याचे समुळ उच्चाटन करण्यात यावे, अशी मागणी सामान्य नागरिकांकडून होत आहे.