आलिया भट्ट, अभिषेक बच्चन, अक्षय कुमार, अजय देवगण, वरुण धवनने मांडले लॉकडाउनचे अनुभव
वृत्तसंस्था / मुंबई
अभिनेता वरुण धवन याच्या पुढाकाराने आलिया भट्ट, अभिषेक बच्चन, अक्षय कुमार आणि अजय देवगण यांनी स्वतःच्या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. या कलाकारांचे चित्रपट आगामी महिन्यांमध्ये डिस्ने प्लस आणि हॉटस्टार प्लॅटफॉर्मवर ओटीटी प्रदर्शित होत आहेत.
20 वर्षांच्या कारकीर्दीत पहिल्यांदाच इतके दिवस घरात राहिलो आहे. इतक्या दिवसांमध्ये मी आणि डेव्हिड धवन दोघांनी मिळून दोन-तीन चित्रपट तयार केले असते. तरीही या जीवनाचीही वेगळी मजा आहे. ‘ये जिंदगी न मिलेगी दोबारा’ अशा शब्दात अभिनेता अक्षय कुमारने स्वतःचा अनुभव मांडला आहे.
फर्स्ट डे फर्स्ट शोकरता मी नेहमीच आतूर असायचो. जेवायची भ्रांत नसायची, परंतु चित्रपट पाहण्याची उत्सुकता दाटलेली असायची. महामारीदरम्यान जे बदलता येत नाही ते स्वीकारावे, असे मी मानतो. कुटुंब, मित्रांसमवेत लिव्हिंग रुममध्ये बसून चित्रपट पहा, शो टाईम, इंटरवल, जेवण सर्व तुमच्याच पसंतीचे असणार असल्याचे अक्षयने म्हटले आहे.
लॉकडाउनच्या काळात गिटार क्लास सुरू केला आहे. याचबरोबर मेडिटेशन कोर्स करत असून त्यामुळे मानसिक आराम मिळत असल्याचे आलियाने म्हटले आहे.
चित्रपटगृहात जाणे आणि घरी चित्रपट पाहणे वेगळे आहे. आम्ही चित्रपट तयार करतो, प्रसंगी भांडण पत्करतो. परंतु प्रेक्षकांना चित्रपटगृह आणि घरी दोन्ही ठिकाणी चित्रपटच पहायला मिळणार असल्याचे संतुलन साधले जाणार आहे. सद्यकाळात चित्रपटगृहात जाणे शक्य नाही. पण आता नवे माध्यम आले असून त्याचे वापरकर्तेही अधिक आहेत. महामारी नव्या गोष्टी सुरू करण्याचे माध्यम असून भविष्यात याच मार्गावर चालावे लागणार असल्याचे अजय देवगणने म्हटले आहे.
चित्रपटांची मेजवानी
आलियाचा सडक 2, अभिषेक बच्चनचा ‘द बिग बुल’, अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बम’ आणि अजय देवगण याचा ‘भूज’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. भारतीय चित्रपटाच्या इतिहासात पहिल्यांदाच दिग्गज कलाकारांचे चित्रपट डिजिटल व्यासपीठावर प्रदर्शित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवर ‘बॉलिवूड की होम डिलिव्हरी’ या नावाखाली चित्रपट प्रदर्शित होत राहणार आहे. यांतर्गत डिस्ने प्लस हॉटस्टारला सध्या 8-9 चित्रपटांचे अधिकार प्राप्त झाले आहेत. ऑगस्ट-सप्टेंबरनंतर चित्रपटगृहे सुरू होण्याची स्थिती पाहता आगामी चित्रपटांची घोषणा केली जाणार आहे. वरुण धवनच्या ‘कुली नंबर वन’ या चित्रपटासंबंधी स्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.