अभिनेता सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या : कारण गुलदस्त्यात : चित्रपट जगतावर शोककळा
प्रतिनिधी / मुंबई
प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित चित्रपटातून सुशांतने आपली वेगळी ओळख बनवली होती. त्यानंतर छिछोरे या चित्रपटातही त्याच्या कामाची विशेष चर्चा झाली. करिअरच्या शिखरावर असताना त्याने उचललेल्या या पावलामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. संपूर्ण बॉलिवूड शोकसागरात बुडाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सुशांतच्या धक्कादायक मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.
गेल्या बऱयाच दिवसांपासून सुशांत सिंग राजपूत नैराश्यात असल्याचे बोलले जात आहे. सहाच महिन्यांपूर्वी तो वांद्रे येथील या घरात राहण्यासाठी आला होता. शनिवारची रात्र त्याने वांद्रे येथील घरातच काढली. मात्र, सकाळी उशिरापर्यंत खोलीचा दरवाजा न उघडल्यामुळे मित्रांकरवी दरवाजा फोडल्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. सुशांतच्या नोकराने याबाबत दूरध्वनी करून पोलिसांना माहिती दिली. सुशांत यांचे वडील सध्या पटना येथे राहत असून त्यांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे. पुत्रवियोगामुळे ते सध्या बोलण्याच्याही मनस्थितीत नसून ते सोमवारी मुंबईत दाखल होणार असल्याचे समजते.
पाच दिवसांपूर्वीच सुशांतची माजी मॅनेजर दिशा सालियन हिने मालाड येथील इमारतीवरून उडी घेत जीवनयात्रा संपवली होती. बाराव्या मजल्यावरून तिने उडी मारली असून याप्रकरणी पोलीस तपास सुरू होता. दिशाचा मृत्यू झाल्यापासून पाच दिवसानंतरच सुशांतने हे पाऊल उचलले. उपायुक्त (कक्ष-9) अभिषेक त्रिमुखे यांनीही या वफत्ताला दुजोरा दिला आहे.
लोकप्रियतेमुळे कारकिर्दीला झळाळी
‘पवित्र रिश्ता’ या टीव्ही मालिकेतून प्रकाशझोतात आलेल्या सुशांतने वयाच्या 34 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. 21 जानेवारी 1986 रोजी बिहार येथे सुशांतचा जन्म झाला होता. छोटय़ा पडद्यापासून त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. ‘पवित्र रिश्ता’ या दैनंदिन मालिकेत त्याची प्रमुख भूमिका होती. ही मालिका अतिशय लोकप्रिय ठरली. गोड चेहऱयाचा आणि हसरा सुशांत घराघरात पोहोचला. ‘किस देश में है मेरा दिल’ ही त्याची पहिली मालिका होती. ‘झलक दिखला जा’ या रिऍलिटी शोमध्येही त्याने आपले नृत्यकौशल्य दाखवून दिले. 2013 साली ‘काय पो चे’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. हा चित्रपट आणि सुशांतच्या अभिनयाचे बरेच कौतुक झाले. त्यानंतर आमीर खानची प्रमुख भूमिका असलेल्या ‘पीके’ या सुपरहिट्ट चित्रपटातील त्याची विशेष भूमिकाही लक्षात राहिली.
शुद्ध देसी रोमान्स, डिटेक्टीव्ह ब्योमकेश बक्षी या चित्रपटांमध्येही त्याने प्रमुख भूमिका साकारल्या. पण, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी याच्या आयुष्यावरील ‘एम एस धोनी’ या चित्रपटामुळे त्याच्या करिअरला कलाटणी मिळाली. या चित्रपटामुळे सुशांत सिंग राजपूत बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता ठरला. सुशांत आणि धोनीची खूप चांगली मैत्री जमली. या चित्रपटानंतर अनेक चांगले चित्रपट त्याला मिळू लागले. केदारनाथ, छिछोरे या चित्रपटातून त्याने आपल्या अभिनयाची चमक दाखवली. तर गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला ड्राईव्ह हा त्याचा अखेरचा चित्रपट ठरला.
बॉलिवूडला जबरदस्त धक्का
आगामी ‘दिल बेचारा’ या चित्रपटात तो झळकणार होता. पण टाळेबंदीमुळे या चित्रपटाचे चित्रीकरण रखडले होते. याशिवायही अनेक चांगल्या चित्रपटांच्या ऑफर्स सुशांतला मिळाल्या होत्या. त्याच्या या अकाली निधनाने बॉलिवूडला जबरदस्त धक्का बसला आहे. त्याच्या सहकाऱयांसह बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडिया आणि अन्य माध्यमातून दुःख भावना व्यक्त केल्या आहेत.
क्राईम ब्रॅन्च पोलीस घटनास्थळी
सुशांत याने नैराश्यामुळे आत्महत्येचे पाऊल उचलल्याचेही बोलले जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास हाती घेतला. त्यानंतर सायंकाळी उशिराने क्राईम ब्रॅन्चचे विशेष तपास पथकही घटनास्थळी दाखल झाले होते. या पथकाला त्याच्या घरात नैराश्यासंबंधी (डिप्रेशन) उपचार सुरू असलेली वैद्यकीय कागदपत्रे हाती लागल्याचे समजते. पण कोणतीही सुसाईड नोट हाती न लागल्याने आत्महत्येमागचे नेमके कारण अद्यापही समोर आलेले नाही.