नेटफ्लिक्सचा शो ‘मनी हाइस्ट’मध्ये टोक्यो ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री उर्सुला कोरबेरो आता जगभरात लोकप्रिय झाली आहे. स्पॅनिश भाषेत मनी हाइस्ट शोचे नाव ‘ला कासा डे पपेल’ आहे. हा शो इंग्रजीसह हिंदीतही डब करण्यात आला आहे. जगातील अन्य देशांसोबत भारतातही याचा मोठा चाहतावर्ग आहे. आता या शोचा पाचवा सीझन येण्यापूर्वी उर्सुलाने एक मुलाखत दिली आहे. बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये हिंदी बोलणारी व्यक्तिरेखा साकारताना आनंद वाटणार असल्याचे तिने म्हटले आहे. मी बॉलिवूडचे अनेक चित्रपट पाहिले आहेत. ही चित्रपटसृष्टी मोठी आणि लोकप्रिय असल्याचे मला माहिती आहे. ‘स्लमडॉग मिलियनेर’ हा चित्रपट त्यात सर्वात पसंत पडल्याचे ती सांगते.
जर कुणी मला हिंदी शिकविणारा व्यक्ती भेटला आणि भाषा शिकण्यासाठी वेळ मिळाला तर मी हिंदी बोलणारी व्यक्तिरेखा चित्रपटात साकारू शकते. अमेरिकेत जेव्हा मी पहिला इंग्रजी चित्रपट केला होता, तेव्हा माझे इंग्रजीचे ज्ञान फारसे चांगले नव्हते. पण मला आव्हाने स्वीकारण्यास आवडतात आणि त्यांना मी आश्वासकपणे सामोरे जात असल्याचे उर्सुलाने म्हटले आहे.