लाल सिंह चड्ढा चित्रपटात आमिरसोबत झळकणार
दक्षिणेतील सुपरस्टार नागा चैतन्य हा आमिर खानचा चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. चैतन्य या चित्रपटासाठी अत्यंत उत्सुक आहे. निर्मात्यांनी या चित्रपटात भारतीय संस्कृती आणि भावनांचा मिलाप घडवून आणला आहे. या चित्रपटाच्या टाइमलाइनमध्ये टीमने अनेक महत्त्वाचे सोहळे जोडले आहेत. याचमुळे हा चित्रपट मोठय़ा पडद्यावर पाहण्यासाठी आणि स्वतःच्या बॉलिवूड पदार्पणसाठी अत्यंत उत्साही असल्याचे त्याने एका मुलाखतीत म्हटले आहे.
लाल सिंह चड्ढा हा चित्रपट हॉलिवूडमधील ‘फॉरेस्ट गंप’चा हिंदी रिमेक आहे. आमिर खान स्वतःच्या या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी त्याचा एक स्पेशल प्रीमियर ‘फॉरेस्ट गंप’मधील अभिनेता टॉम हँक्ससाठी आयोजित करण्याचा विचार करत आहे. टॉम हँक्स यांनी या चित्रपटात साकारलेली भूमिका आणि त्यांचा अभिनय बेजोड मानला जातो.
नागा चैतन्यने अलिकडेच समांथा रुथ प्रभूसोबत घटस्फोट घेतला आहे. समांथा आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत असताना नागा चैतन्य देखील बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवत आहे. समांथाने फॅमिली मॅन 2 या वेबसीरिजमध्ये वटविलेली भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरली आहे.