फोंडा पोलिस स्थानकावर बोकडबागवासियांची धडक : गावकऱयांनी दहाजणांना ठेवले ढांबून : सदरप्रकरणी एसटी आयोगाकडे प्रश्न प्रलंबित
प्रतिनिधी / फोंडा
रामनाथी-फोंडा येथील एका नामांकित संस्थेशी संबंधित एका दहाजणांच्या गटाने बोकडबाग-बांदोडा येथील डेंगरमाथ्यावर बळजबरीने प्रवेश घेतल्याची तक्रार फोंडा पोलीस स्थानकात बोकडबाग दहाजण संघर्ष समितीने केली आहे. सदर जमीन गावकऱय़ाची देवभूमी असून निसर्गरम्य डोंगरमाथ्यावर असलेल्या झाडांची कत्तल, डोंगराचे सपाटीकरण आणि पर्यावरणाचा ऱहास कदापी होऊ देणार नाही असा निर्धार बोकडबागवासियांनी केला असून संपुर्ण गाव एकसंध होऊन लढा देणार असल्याचा इशारा समितीच्या सदस्यांनी दिला आहे.
यावेळी डोगरमाथ्यावर बळजबरीने प्रवेश केलेल्या दहाजणांना येथील स्थानिकांनी ढांबून ठेवले, त्यानंतर पोलीस बंदोबस्तात त्याची सुटका करण्यात आली. फोंडा पोलिसांनी दोन्ही गटाना सक्त ताकिद दिली असून सकारात्मक चर्चेनंतर सदर प्रकरण मिटवण्यात आले. यापुर्वी बोकडबाग येथील डोंगरमाथ्यावर मोजमापाचे काम करण्यास सुरूवात आले होते. त्यावेळी संपुर्ण गावकऱयानी एकजूट दाखवून सदर प्रकार हाणून पाडला होता. गावकऱयांनी याप्रकरणी उपजिल्हाधिकारी, मामलेतदार, नगर नियोजन खाते यांना निवेदने सादर केलेली असून कायदेशीर बाबींनुसार एसटी आयोगाच्या न्यायालयात सदर प्रकरण प्रलंबित आहे. त्यानुसार संशयित असलेल्या काही लोकांना या जमिनी प्रवेश करू नये अशी सक्त ताकिद असतानाही त्यांनी मोठे धाडस करण्यामागे स्थानिक आमदाराचा हात असल्याचा संशय येथील स्थानिकांनी व्यक्त केला आहे. बोकडबाग डोंगरमाथ्यावरील जमीनप्रश्नी स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतेच सोपस्कर पुर्ण करू नये अशी मागणी दहजण संघर्ष समितीने यावेळी केली आहे.