ठार झालेला युवक अमर नाईक हा नवेवाडे वास्कोतील : कुठल्या तरी विषयावर दीर्घ चर्चा झाल्यानंतर खून : अमरवर पाठिमागून झाडल्या गोळय़ा
प्रतिनिधी / वास्को
वास्को बोगमाळो येथील रंघवी इस्टेटजवळ एका युवकाला गोळय़ा घालून ठार मारण्याची घटना गुरूवारी संध्याकाळी घडली. ठार झालेला युवक नवेवाडे वास्कोतील राहणारा असून अमर नाईक (36 वर्षे) असे या युवकाचे नाव आहे. गोळय़ा घालून दोघे संशयित घटनास्थळावरून पसार झाले. त्यांचा रात्री उशिरापर्यंत ठावठिकाणा लागला नव्हता. मयत युवकाचा एक सहकारी घटनास्थळावरून इनोव्हा कार घेऊन पळाल्याने बचावला. ही घटना पैशांच्या किंवा मालमत्तेसंबंधीत वादावरून सुपारी देऊन घडवून आणली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मुरगाव तालुक्यातील वेर्णा पोलिसस्थानक क्षेत्रातील सांकवाळ येथे हल्लीच आरटीआय कार्यकर्ते नारायण नाईक यांच्यावर झालेल्या खुनी हल्ल्याचे पडसाद तीव्र असतानाच व त्या हल्ल्यातील संशयीत गुन्हेगार अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नसताना पुन्हा गोळय़ा घालून एका युवकाला ठार मारण्याची घटना दिवसाढवळय़ा घडल्याने वास्को परिसरात खळबळ माजलेली आहे. ही घटना वेर्णा पोलिसस्थानक हद्दीतीलच वेलसाव पाळे पंचायत क्षेत्रातील बोगमाळोतील रंघवी इस्टेटजवळील भागात घडली. तटरक्षक दलाची वसाहतही जवळच आहे. वास्को पोलीस या खुनांत गुंतलेल्या गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत व्यस्त होते. संशयित खूनी ज्या कारमधून या कामगीरीवर आलेले होते, ती कार अपघाताने रस्त्याबाहेर घसरल्याने हल्लेखोरांनी ती कार तिथेच टाकून पोबारा केला आहे. तसेच पोलिसांना त्या संशयितांची ओळखपत्रेही आढळली आहेत. त्यामुळे पोलीस या गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्याची चिन्हे आहेत.
दीर्घ चर्चेचे पर्यावसन अखेर खुनात
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नवेवाडे वास्कोतील युवकाला गोळय़ा घालून ठार करण्याची ही घटना गुरूवारी संध्याकाळी साडे चारच्या सुमारास बोगमाळो रोडवरील रंघवी इस्टेटजवळील एका आतील रस्त्यावर घडली. घटनास्थळा जवळच सागर एन्क्लेव नावाची वसाहतही आहे. या ठिकाणी एक इनोव्हा कार व एक रेन्ट अ कार (स्वीफ्ट कार) उभी असल्याचे अनेकांनी पाहिले होते. परंतु असे काही होईल असा संशय कुणाला आला नव्हता. इनोव्हा कारमध्ये मयत अमर नाईक व त्याचे दोघे मित्र होते. स्विफ्ट कारमध्ये दोघे जण होते. यांचे एकत्र येणे व चर्चा करण्याचे पर्यावसन शेवटी खूनात झाले व खळबळ उडाली.
पाठीमागून डोक्यात गोळय़ा झाडल्या
मयत अमर हा सकाळी अकरा वाजता घरातून बाहेर पडला होता. त्यांने आपल्या दोघा जवळच्या मित्रांना बोलावले व ते बोगमाळोतील त्या ठिकाणी गेले होते. त्या ठिकाणी एका बंगल्यात अमर व कारमधून आलेल्या त्या दोघांची बराच वेळ चर्चा झाली होती. एका ठिकाणी त्यांनी मिळून पाहणीही केली होती. दुपारी अमरचा स्मॅगसन हा मित्र काही कामानिमित्त मडगावकडे रवाना झाला. त्यामुळे प्रितेश कुट्टीकर हा मित्र त्याच्यासोबत होता. बंगल्यातील चर्चेनंतर त्यांच्यात काही तरी बिनसले. त्यानंतर अमर आणि प्रतिक दोघेही इनोव्हामध्ये येऊन बसले. तेवढय़ात बेसावध असलेल्या अमरवर गाडीत असतानाच त्या दोघापैकी एकाने पाठीमागून गोळय़ा झाडल्या. त्यामुळे तो गाडीतच कोसळला.
हल्लेखोर कार सोडून पसार
तेवढय़ात अधिक गोळीबार चुकवण्यासाठी व जीव वाचवण्यासाठी प्रितेशने इनोव्हा घेऊन तेथून निसटण्याचा प्रयत्न केला असता ते दोघेही स्विफ्ट कारने त्याचा पाठलाग करू लागले. यावेळी तेथील एका वळणावर त्यांची स्विफ्ट कार नियंत्रण गेल्याने झाडे झुडपे असलेल्या खाईत गेली. ती बाहेर काढणे त्यांना शक्य झाले नाही. त्यामुळे ते कार तेथेच टाकून पसार झाले. त्यानंतर सुटकेचा निश्वास टाकून प्रितेश याने या घटनेबाबत इतर मित्रांना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले व अमर याला चिखलीतील उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डोक्यातच गोळय़ा झाडण्यात आल्याने त्याला आधीच मृत्यू आला होता.
पोलीस अधीक्षक पंकजकुमार सिंग यांच्याकडून पाहणी
मिळालेल्या माहितीनुसार त्या दोघांपैकी एकाला कुणाचा तरी फोन आला होता. त्यानंतरच त्या हल्लेखोरांने गोळय़ा झाडण्याचे पाऊल उचलले. त्या दोघांकडेही रिव्हालवर होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक पंकजकुमार सिंग यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली तसेच चिखलीतील उपजिल्हा हॉस्पिटललाही त्यांनी भेट देऊन अधिकाऱयांशी चर्चा केली. या प्रकरणाचा पोलीस सखोल तपास करीत असल्याचे स्पष्ट करून यासंबंधी अधिक माहिती देण्याचे त्यानी टाळले.
कार सापडल्याने पोलिसांच्या हाती धागेदोरे
मिळालेल्या माहितीनुसार ज्या प्रकारे हा खून करण्यात आला ते पाहता हे सुपारीचेच प्रकरण असण्याची दाट शक्यता आहे. अमर नाईक हा नवेवाडे वास्कोतील मध्यमवर्गीय कुटुंबातील असून खाण बंदीपूर्वी तो खाण व्यवसायात होता. या धंदय़ात त्याने बराच जम बसवला होता. त्यामुळे अनेकांकडे त्याचे व्यवसायिक संबंध होते. खाण बंदीनंतर तो मालमत्ता विक्री व्यवसायाकडे वळला होता. पैशाची देवाणघेवाण किंवा मालमत्ता विक्रीच्या वादातून हा खून झालेला असण्याची शक्यता आहे. पोलिसांना घटनास्थळी आढळलेल्या कारमुळे काही धागे दोरे हाती लागलेले असून दोन ओळखपत्रेही कारमध्ये सापडली आहेत. अर्जुन घोरपडे (कोल्हापूर) व कुवंर कृष्णआयुष कृष्ण कुमार सिंग अशी नावे त्या ओळखपत्रात आहेत. हल्लेखोरांनी हणजुण येथून रेन्ट अ कार घेतली होती. पोलिसांना सदर कारचे मालक सापडले असून त्या संशयीतांचा कसून शोध घेण्यात येत आहेत.