प्रतिनिधी/पेठ वडगाव
लॉकडाऊनचा फायदा उठवत नागरिकांना लुबाडण्याचे प्रकार वाढीस लागले असताना त्यात आणखी एक भर पाडली आहे. बोगस वाहन ई-पास देवून मुंबई येथील प्रवाशांची लुट सुरु झाली आहे. किणी टोल नाक्यावर वडगाव पोलिसांनी गेली दोन दिवसात चार वाहने जप्त करून चालकावर कारवाई केली आहे. कोरोनाच्या काळात बेहाल झालेल्या मुंबईकरांना आता बोगस पास देवून फसविण्यासाठी सक्रीय झालेल्या टोळीचा गोरख धंदा कोल्हापूर जिल्ह्यातील पोलिसांनी उघडकीस आणला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असल्याने मुंबईहून कोल्हापूर जिल्ह्याकडे आपल्या गावी येणार्यांची संख्या प्रचंड वाढू लागली आहे. या प्रवाशांना लागणारा प्रवासी वाहन पास बनावट देवून फसवणूक करण्याचे प्रकार गेल्या चार दिवसापासून पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर उघडकीस येत आहेत.
किणी टोल नाक्यावर असलेल्या पोलीस बंदोबस्तात वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी हे पास खरे आहेत का? याची बारकोडवरून तपासणी केली असता बोगस पासचा प्रकार उघडकीस आला. वडगाव पोलिसांनी एक मिनी बस व दोन कार जप्त करून चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले. या वाहनातील प्रवाशांना परत मुंबई येथे वडगाव पोलीस ठाण्याकडील गाडीने पुन्हा परत पाठविण्यात आले तर काहीना कोरोन्टाइन करण्यात आले.
पोलिसांच्या कारवाईने मुंबई, नवी मुंबई, ठाणे जिल्ह्यातील ट्रॅव्हलर्स एजन्सींचा गोरख धंदा यामुळे उघडकीस आला असून पोलिसांनी बोगस पास देणार्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अशा प्रकारे बोगस पास देवून अशा एजन्सीकडून प्रवाशांना अडचणीत आणले जात असून अशा फसवणुकीला बळी पडण्यापासून नागरिकांनी सावध राहण्याची गरज पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी व्यक्त केली. अशा प्रकारामुळे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर किणी टोल नाक्यावर प्रत्येक प्रवाशी पास खरा आहे का याची कसून तपासणी केली जात असून अशा प्रकारे प्रवास करणारी वाहने जप्तीची कारवाई केली जात असल्याचे पो.नि.काळे यांनी सांगितले.