प्रतिनिधी / मिरज
मिरज शहरातील खॉंजा वसाहत येथे शिधापत्रिकेवर बोगस शिक्के मारून दिल्या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलिसांनी राष्ट्रवादीचे शहर जिल्हा उपाध्यक्ष आणि माजी नगरसेवक हारुण खतीब याला अटक केली आहे. तीन वर्षांपूर्वी मागील महापालिका निवडणुकीच्या अगोदर या भागातील 45 नागरीकांच्या शिधापत्रिकेवर अन्न सुरक्षा योजनेंतर्गत धान्य मिळवून देण्याच्या आमिषाने बोगस शिक्के मारून नागरिकांची फसवणूक करण्यात आली होती.
या प्रकरणी राष्ट्रवादीचा पदाधिकारी असलेल्या हारुण खतीब याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. बोगस शिक्क्या प्रकरणी तत्कालीन तहसीलदार शरद पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले होते. यात 45 नागरीकांना प्रत्येकी शंभर रुपये घेऊन बोगस शिक्के मारून शिधा पत्रिका दिल्याचे सिद्ध झाले होते. याप्रकरणी महात्मा गांधी चौक पोलिसांनी तीन वर्षानंतर संदीप पाटील या तरुणाला अटक केली होती. तर हारुण खतीब याच्यावर ही गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंगळवारी हारुण खतीब याला अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.