गावात तणावपूर्ण वातावरण : बोगस लाभार्थ्यांना घरे मंजूर केल्याची तक्रार केल्याने हल्ला : हंदिगनूर ग्रा. पं.चा कारभार चव्हाटय़ावर
वार्ताहर /अगसगे
भ्रष्टाचाराच्या आरोपाचा उलगडा करणाऱया युवकावर हल्ला करून त्याच्या घराच्या काचा फोडल्याचा प्रकार बोडकेनहट्टी येथे मंगळवारी घडला. यामुळे गावात वातावरण तणावपूर्ण बनले आहे. काकती पोलिसांनी वातावरण निवळण्यासाठी प्रयत्न चालविले असून यामुळे हंदिगनूर ग्राम पंचायतीचा भ्रष्टाचार चव्हाटय़ावर आला आहे.
याबाबतची माहिती अशी की, हंदिगनूर ग्रा. पं. व्याप्तीमध्ये येणाऱया बोडकेनहट्टी गावामध्ये 2021 मध्ये अतिवृष्टीने घरांची पडझड झाली होती. त्यावेळी महसूल खात्याच्या अधिकाऱयांनी व गावातील काही एजंटांनी प्रत्येकी बोगस लाभार्थ्यांकडून 50 हजार रुपये घेऊन घरे मंजूर केली आहेत. यामध्ये निम्म्याहून अधिक बोगस घरेच आहेत. त्यामुळे खऱया लाभार्थ्यांना शासनाच्या नुकसान भरपाईपासून वंचित रहावे लागले आहे. एकूण 50 घरे मंजूर झाली आहेत. याबाबत सोमवार दि. 14 रोजी गावातील खऱया लाभार्थ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. एम. जी. हिरेमठ यांना निवेदन दिले. या प्रकरणाची चौकशी करून योग्य लाभार्थ्यांची निवड करावी. यामध्ये मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून दोषीवर कारवाई करावी. महसूल खात्याच्या अधिकाऱयांनी व तहसीलदार कार्यालयातील अधिकाऱयांनी पडलेल्या घरांची घटनास्थळी पाहणी न करता पैसे घेऊन राजीव गांधी वसती योजनेमध्ये बोगस लाभार्थ्यांना घरे मंजूर केली आहेत. याबाबत ग्रा. पं. विकास अधिकाऱयांना व इंजिनिअर यांना विचारल्यास आम्ही कोणताच अहवाल पाठवला नसल्याचे सांगण्यात येते. यामागे कोणाचा हात आहे? अधिकाऱयांच्या सहय़ा नसताना घरे कशी मंजूर झाली? याची चौकशी व्हावी व दोषींवर कारवाई करावी. म्हणून निवेदन दिले होते. याचे तीव्र पडसाद मंगळवारी उमटले. निवेदन दिलेल्यांमधील शट्टू नाईक यांच्या घरावर काही जणांच्या टोळक्याने दगडफेक करून त्यांना मारहाण करण्यात आली. यामागे काही भ्रष्ट नेते व पुढाऱयांचा हात असल्याची चर्चा सुरू होती. घटनेची माहिती मिळताच काकती पोलीस स्थानकाचे निरीक्षक आय. एस. गुरुनाथ व पीएसआय अविनाश यरगोप यांनी घटनास्थळी धाव घेऊन वातावरण निवळण्याचा प्रयत्न केला. सध्या गावात तणावपूर्ण वातावरण आहे.