ऍडलेड
पुरुष दुहेरीतील भारतीय जोडी रामकुमार रामनाथन व रोहन बोपण्णा यांनी येथे सुरू असलेल्या ऍडलेड इंटरनॅशनल एटीपी 250 स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. महिला दुहेरीत सानिया मिर्झा-नादिया किचेनॉक यांनीही उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
रामकुमार व बोपण्णा पहिल्यांदाच एकत्र खेळत असून त्यांनी अमेरिकेच्या आठव्या मानांकित नाथानियल लॅमोन्स व जॅक्सन विथ्रो यांना 6-7 (4-7), 7-6 (7-3), 10-4 असा पराभवाचा धक्का देत आगेकूच केली. भारतीय जोडीने याआधी जेमी सेरेटॅनी व ब्राझीलचा फर्नांडो रॉम्बोली यांचा 6-2, 6-1 असा पराभव केला होता. बेंजामिन बॉन्झी व हय़ुगो नाइस आणि सँडर गिली व जोरान व्लीजेन यातील विजयी जोडीशी बोपण्णा-रामकुमारची पुढील लढत होईल.
महिलांच्या डब्ल्यूटीए 500 स्पर्धेत भारताची सानिया मिर्झा व युक्रेनची नादिया किचेनॉक यांनी एका सेटची पिछाडी भरून काढत द्वितीय मानांकित गॅब्रिएला डाब्रोवस्की व गुलियाना ओल्मॉस यांचा 1-6, 6-3, 10-8 असा धक्कादायक पराभव करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्यांची पुढील लढत प्रिस्किला होन-चार्लोट केम्पेनअर्स पॉक्स आणि शेल्बी रॉजर्स व हीदर वॅटसन यापैकी एका जोडीशी होईल.