लाच स्वीकारताना अडकला होता एसीबीच्या जाळय़ात
प्रतिनिधी/ बेळगाव
लाच स्वीकारताना साडेचार वर्षांपूर्वी एसीबीच्या जाळय़ात अडकलेल्या बोरगाव (ता. चिकोडी) येथील तलाठय़ाला शुक्रवारी न्यायालयाने तीन वर्षे सक्त मजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. येथील चतुर्थ अतिरिक्त जिल्हासत्र व विशेष न्यायाधीश विजय व्ही. यांनी ही शिक्षा ठोठावली आहे.
बोरगावचा तलाठी शिवलिंगय्या परवय्या बोरगांवी याला दि. 7 मे 2016 रोजी एसीबीच्या अधिकाऱयांनी 8 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले होते. इचलकरंजी येथील राजू लक्ष्मण पाच्छापुरे यांच्या जमिनी संबंधीच्या कामांसाठी लाच स्वीकारताना त्याला अटक करण्यात आली होती. न्यायालयात त्याच्या विरूद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.
शुक्रवारी विशेष न्यायालयाने पीसीऍक्ट 1988 कलम 7 अन्वये त्याला तीन वर्षे सक्त मजुरी, 5 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे. 13(1)(डी) सहकलम 13(2), पीसी कायदा 1988 अन्वये चार वर्षे सक्त मजुरी, 10 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने सक्त मजुरीचा आदेश ठोठावला आहे. एसीबीचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ कब्बुरी यांनी या प्रकरणाची चौकशी करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. सरकारतर्फे प्रवीण अगसगी यांनी काम पाहिले. एसीबीने दाखल केलेल्या खटल्यातील ही पहिली शिक्षा असल्याचे सांगण्यात आले.