प्रतिनिधी / नागठाणे :
कोरोना काळात प्रवासी वाहतूक करताना शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्याने बोरगाव पोलीसांनी माजगाव फाटा (ता.सातारा) येथे हॉटेलवर थांबलेल्या दोन खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई केली. त्यांच्याकडून प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला.
कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर शासनाने प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सना नियम लागू केले आहेत. सातारा तालुक्यातील माजगाव फाटा येथे एका हॉटेलवर तहसीलदार ट्रॅव्हल्स व शेफाली ट्रॅव्हल्स या दोन ट्रॅव्हल्स उभ्या असल्याचे बोरगाव पोलिसांच्या निदर्शनास आले. यावेळी पोलिसांनी दोन्ही ट्रॅव्हलच्या चालकांकडे अधिक चौकशी केली. यावेळी दोन्ही ट्रॅव्हल्समधील कोणत्याही प्रवाशाकडे इ-पास नसल्याचे व कोविड टेस्ट केल्याचे प्रमाणपत्र नसल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तात्काळ दोन्ही ट्रॅव्हलच्या चालकांना प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड आकारून तो तात्काळ भरूनही घेतला. सपोनि डॉ.सागर वाघ, हवालदार विशाल जाधव व विजय साळुंखे यांनी ही कारवाई केली.