प्रतिनिधी/ नागठाणे
सध्या समाजात महिला, विद्यार्थी व विद्यार्थीनी यांच्यावर होत असलेल्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी-विद्यार्थिनी सजग व जागरूक रहावेत, या उद्देशाने सातारा तालुक्यातील बोरगाव पोलीस ठाण्यामार्फत ‘पोलीस काका-पोलीस दिदी’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येत असलेल्या शाळा-महाविद्यालयांमधून महिला पोलिसांसह पोलीस जवान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्याना सोशल मीडियाचा अतिवापर, त्याचे होणारे दुष्परिणाम, त्यातून घडणारे गुन्हे, मुलींच्या सुरक्षिततेचे कायदे, महिला हेल्पलाईन नंबर 1091 चाईल्ड हेल्पलाईन नंबर 1098 याबाबत माहिती दिली जात आहे. तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींना ‘सुरक्षित स्पर्श- असुरक्षित स्पर्श’ याबाबतही जागरूक केले जात आहे. जर अश्या प्रकारचा कोणताही अनुभव समाजात वावरताना आल्यास तात्काळ घरातील पालक तसेच पोलीस काका अथवा पोलीस दिदी यांना सांगण्याचे आवाहनही केले जात आहे. तक्रारदाराचे नाव अश्यावेळी गोपनीय ठेवले जात असल्याने व पोलीस त्यांना संपूर्ण सहकार्य करणार असल्याने कोणीही घाबरू नये, असे आवाहनही करण्याचे येत आहे. आत्तापर्यंत परिसरातील नागठाणे, अतीत, काशीळ या मोठय़ा गावातील महाविद्यालयांबरोबरच भरतगाववाडी, निनाम-पाडळी, मांडवे, सासपडे, खोजेवाडी, वेणेगाव, कोपर्डे या ग्रामीण भागतील शाळांमधून हे प्रबोधन करण्यात आले आहे.
जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजय बोर्हाडे व सहायक पोलीस अधीक्षक आंचल दलाल व बोरगावचे सपोनि डॉ. सागर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर, हवालदार अमोल गवळी व महिला पोलीस तेजश्री जगताप हा उपक्रम राबवत आहेत.