वार्ताहर / बोरगाव
जमियत उलमा ए हिंद चित्रदुर्ग यांच्यावतीने बोरगावसह परिसरात सुमारे 350 पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली.
गेल्या महिन्यात दूधगंगा, वेदगंगा नदीकाठावर महापुराने थैमान घातल्याने घरे व पिकांचे मोठे मोठे नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांना आधार व पाठबळ देण्यासाठी अनेक मंडळे व सेवाभावी संस्था मदतीला धावून येत आहेत. मुस्लिम समाजातील जमियत उलमा ए हिंद, चित्रदुर्ग या संस्थेने सामाजिक जाणिवेतून बोरगाव येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूचे किट वाटप केले. अध्यक्ष मौलाना मुसबसाब कासमी, मौलाना अब्दुल कादर, मौलाना तल्हा यांच्या हस्ते या वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना मुसबसाब कासमी म्हणाले, सामाजिक जाणिवेतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. नैसर्गिक आपत्ती उद्भवलेल्या भागात जावून मदत दिली जाते. सामाजिक बांधिलकी या नात्याने आमच्या संघटनेचे काम सुरू आहे. संकटकाळी मदत करणे हे पुण्याचे काम असल्याचे सांगितले. यावेळी नवाज कापसे, हाफीज उस्मान, हाफीज मोहम्मद अली, हाफिज उमर, हाफिज अबू बकर, हाफिज असलम, नवाज कापसे, रफिक मकानदार, साबिर नदाफ, तौफिक मुजावर, हारुण भाई यांच्यासह मशिदीचे कार्यकर्ते उपस्थित होते.