प्रतिनिधी/ फोंडा
फोंडा-मडगाव महामार्गावर बायथाखोल बोरी येथे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या टँक हाऊसमध्ये गळा आवळून खून केलेल्या एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडल्याची घटना काल शुक्रवारी सकाळी 8 वा. सुमारास उघडकीस आली. हा मृतदेह मागील काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मूळ नेपाळी युवतीचा असल्याची ओळख पटली आहे. दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक अरविंद गावस यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस महासंचालक परमादित्य यांनी फोंडा पोलिस स्थानकात भेट घेऊन घटनेचा आढावा घेतला. संशयिताला दहा तासांच्या आत गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे.
याप्रकरणी फोंडा पोलिसांनी 10 तासांच्या आत खुनाचा छडा लावताना मयताचा संशयित प्रियकर मन्सूर हुसेन शेख (वय 20 वर्षे, राहणारा बाबल्याखळी फोंडा, मूळ. गदग कर्नाटक) याला भा.दं. सं. 302 कलमाखाली अटक करण्यात आली आहे. कोविड-19 लॉकडाऊन स्थितीचा फायदा घेत संशयिताने युवतीला अज्ञातस्थळी बायथाखोल बोरी येथील डोंगरमाथ्यावरील टँक हाऊसमध्ये गळा आवळून खून करण्याचे कृत्य केले. याप्रकरणी फोंडा पोलिस अधिक तपास करीत आहेत.
खुनाचा प्रकार चारपाच दिवसांपूर्वीचा
मयत युवतीने सलवार कमीझ असा वेश परिधान केला असून तिच्या गळय़ात पर्स जशीच्या तशी लटकविण्यात आलेली घटनास्थळी आढळली. मृतदेह सडलेल्या अवस्थेत असून सदर घटना चार पाच दिवसापुर्वी घडली असावी असा अंदाज फोंडा पोलिसांनी व्यक्त केला आहे. वैद्यकीय चाचणीत युवतीचा गळा आवळून खून झाल्याचा स्पष्ट झाले आहे.
काजू बागायतीमुळे प्रकरणाला वाचा फुटली
या टँक हाऊसच्या गेटची दारे सताड उघडी असून हे टँक हाऊस बेवारशी बनले आहे. याचा फायदा संशयितांनी घेतला. मात्र काजूच्या मोसमात बागायतीत काजू वेचण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांना वास येत असल्यामुळे या प्रकाराला वाचा फुटली. अन्यथा या दुर्गम स्थानी कुणी फिरकलेच नसते. घटनास्थळी श्वानपथकासह फॉरेन्सिक टिमला पाचारण करण्यात आले होते. टँक हाऊसच्या खोलीत एका लाकडी बॉक्सवर सदर मृतदेह लटकवून ठेवला होता. याप्रकरणी कुणालाही सुगावा लागू नये म्हणून लाकडी घोडय़ाच्या आधारे दरवाजा बंद करण्यात आला होता. मात्र कुंपणाबाहेरील काजू बागायतीमध्ये काहीतरी कुजल्याचा वास येत असल्यामुळे या प्रकाराला वाचा फुटली.
पेमप्रकरणातून झाला खून
हा खून प्रेमप्रकरणातून झाल्याचा संशय पोलिसांनी वर्तविला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित मन्सूर शेख हा फोंडा येथील चप्पल दुकानात काम करीत असून सदर मुलगीही दुसऱया ठिकाणी सेल्सगर्ल म्हणून कामाला होती, त्यावेळी त्यांचे प्रेम जुळले होते. मात्र युवतीच्या घरच्यांकडून त्याला विरोध होता. मयत युवतीचे अन्य एकाबरोबर प्रेमप्रकरण असल्याचे उघडकीस आल्यानंतर तिला अद्दल घडविण्यासाठी आपण हे कृत्य केल्याची जबांनी संशयित मन्सूरने पोलिसांना दिली आहे.
मन्सूरने आपल्या जीए 05 एच 7125 क्रमांकाच्या दुचाकीने या युवतीला बायथाखोल येथे टेकडीवर नेले व गळा आवळून खून केल्याचे जबानीत म्हटले आहे. मयत युवती पाच भावडांपैकी एक असून मूळ नेपाळ येथील आहे. हे कुटुंब मागील काही वर्षापासून कुर्टी येथे वास्तव्यास आहे. कुत्र्याने चावा घेतल्यामुळे उपजिल्हा इस्पितळातील डॉक्टरकडे जाणार असे सांगून ही युवती सोमवार 13 रोजी घराबाहेर पडल्यापासून बेपत्ता झाली होती. गुरूवार 16 रोजी तिच्या कुटुंबियांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर फोंडा पोंलिसांनी अज्ञाातविरोधात अपहरणाची तक्रार दाखल केली होती.
निर्जनस्थळावरील टँक हाऊस ठरते असुरक्षित
बायथाखोल टेकडीवर असलेले सां.बां.खात्याचे हे टॅकहाऊस सुरक्षित नसून काही गावातील युवक या टँक हाऊसचा अमलीपदार्थ, जुगार, पाटर्य़ा तसेच इतर गैरव्यवहारांसाठी उपयोग करीत असतात. या ठिकाणी गेटला कुलुप नसते तसेच येथे असलेली खोलीही खुली असल्याने अशा प्रकारांना वाव मिळत आहे. याप्रकरणी बोरी पंचायतीच्या पंचसदस्यांनी नाराजी व्यक्त केली असून पोलिसांनी गस्त घालावी, असे त्यांनी सुचविले आहे. यापुर्वी या टँक हाऊसचा गैरव्यवहारासाठी उपयोग झाल्याचा संशयही त्यांनी व्य़क्त केला आहे. अशा निर्जनस्थळावर बेवारशी असलेले टँक हाऊस कुलुपबंद करावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
याप्रकरणी फोंडा पोलिसांनी ताबडतोब कारवाई करताना मयत युवतीच्या प्रियकरांना गजाआड केले. त्याच्या जबानी नोंद केल्यानंतर तपासाअंती संशयित मन्सूर हुसेन शेख यांच्याविरूद्ध भा.दं.सं. 302 कलमाखाली गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे.
फोंडा पोलिसांचे अभिनंदन अन् बक्षीस
फोंडय़ाचे पोलिस उपअधीक्षक नेल्सन अल्बुकर्क यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मोहन गावडे, उपनिरीक्षक सूरज काणकोणकर, केदारनाथ जल्मी, जितेंद्र गावडे, सिद्धेश गावस, वंदेश सतरकर, विठ्ठल नाईक, महेश गावडे, संदीप नाईक, अमेय गोसावी, गोरखनाथ गावस यांच्या टीमने धडक कारवाई करुन दहा तासांच्या आत संशयित मन्सूर शेखला गजाआड करण्यात यश मिळविले. लॉकडाऊनच्या स्थितीतही अपुऱया कर्मचाऱयांसह काम करणाऱया फोंडा पोलिसांनी दहा तासांच्या आत या खुनाचा छडा लावण्यात यश मिळवल्याने ग्रामस्थांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे. पोलिस महासंचालक परमादित्य यांनी कौतुकाची थाप देताना रू 15 हजारांचे बक्षीस फोंडा पोलिस टीमला जाहीर केले आहे.