प्रतिनिधी / शिरोडा
बोरी पंचायत मंडळाने मागील दोन वर्षांच्या कार्यकाळात विविध विकासकामांवर पंचायत निधीतून केलेल्या खर्चाबद्दल बोरी ग्रामसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला. या संपूर्ण खर्चाचे विशेष ऑडिट झाल्याशिवाय वार्षिक अंदाजपत्रकाला मंजूरी देण्यास जोरदार विरोध करण्यात आला. पंचायत क्षेत्रात कचरा प्रकल्पासंबंधी ठराव एकमताने संमत करण्यात आला.
सरपंच ज्योती नाईक यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी पंचायत सभागृहात ही ग्रामसभा पार पडली. पंचायतीच्या एप्रिल 2020 ते जानेवारी 2021 या काळातील जमा-खर्च साधारण साडेपाच लाख रुपये दाखविण्यात आला आहे. त्यात खर्च केलेल्या गोष्टींची सविस्तर माहिती पुढील ग्रामसभेत देण्याची मागणी करण्यात आली. पंचायत सभागृहाचा विस्तार व सुशोभीकरणावर रु. 1 कोटींची मंजूरी देण्यात आली आहे. गोवा राज्य साधसुविधा विकास महामंडळातर्फे हे काम होणार असून जुन्या साहित्याचा हिशेब देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. याशिवाय प्रकल्पाची निविदा, कामाचा आदेश व सविस्तर तपशील पुढील ग्रामसभेत सादर करण्यात यावा व त्यावर विशेष ऑडिट करण्याची मागणी जयेश नाईक यांनी केली. या ऑडिट समितीमध्ये ग्रामस्थांचे प्रतिनिधी म्हणून उत्कर्ष बोरकर यांची नियुक्ती करण्याची मागणीही करण्यात आली. पंचायतीच्या जुन्या इमारतीची दुरुस्ती करताना त्यावर किती खर्च झाला, याबद्दल प्रश्न उपस्थित करीत पंचायत मंडळाने त्याचा पूर्ण हिशेब ग्रामसभेसमोर मांडावा, असा ठराव घेण्यात आला.
बोरी ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी असलेला कचरा प्रकल्प उभारण्यासंबंधीचा ठराव एकमताने संमत करण्यात आला. बोरी कोमुनिदादकडून त्यासाठी 4 हजार चौ. मिटर जागा बोरी पंचायतीसाठी तर 4 हजार चौ. मिटर कवळे पंचायतीला उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव आहे. कवळे पंचायतीला कचरा प्रकल्पासाठी सशर्थ अटीवर ही जागा देण्याची सूचना करण्यात आली. बोरी ग्रामविकास समिती, तसेच बोरी व कवळे पंचायत मंडळाने त्यावर सविस्तर चर्चा करुनच निर्णय घ्यावा असा ठराव उत्कर्ष बोरकर यांनी मांडला. माजी सरपंच भावना नाईक यांच्या कार्यकाळात कचरा व्यावस्थापनावर झालेल्या पत्रव्यावहाराची सविस्तर माहिती पुढील ग्रामसभेत देण्याची मागणी करण्यात आली.
प्रभाग क्र. 7 चे पंचसदस्य कॉस्तांसियो लुईस हे मागील काही पंचायत मंडळाच्या बैठकांनी अनुपस्थित राहिल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी प्रश्न उपस्थित करीत ते विदेशात असल्याचा संशय व्यक्त केला. त्यासंबंधी काही ग्रामस्थांनी त्यांना अपात्र ठरविण्याची मागणी केली होती. त्यावर येत्या 26 फेब्रुवारी रोजी गटविकास कार्यालयात सुनावणी होणार असल्याची माहिती सचिव विराज नाईक यांनी दिली. कलमामळ मैदानाच्या विकासाचा पाठपुरावा व साधसुविधा, तिशे बोरी येथे मैदान व वॉकिंग ट्रक, दोन ठिकाणी कचरा शेडला लागलेल्या आगीची कारणे व चौकशी, कलमाळ बोरी येथील नियोजित सांस्कृतिक भवनाचे रखडलेले काम, बेतकी बोरी येथे इस्कॉन मंदिर, रस्ता रुंदीकरण हे मुद्दे चर्चेला आले. पंचायत क्षेत्रातील पाणी समस्या, ना हरकत दाखले देताना कोणते निकष लागू केले जातात, बोरी पंचायतीचे संकेतस्थळ या अन्य मुद्दय़ांवरही चर्चा झाली.
जिल्हा पंचायत सदस्य दीपक बोरकर यांनी विकासकामांना चालना दिल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठरावा घेण्यात आला. स्वागत सरपंच ज्योती नाईक यांनी केले. यावेळी उपसरपंच दिपिका नाईक, पंचसदस्य भावना नाईक, रुपाली नाईक, विनय पारपती, रामदास गावडे, तुकाराम बोरकर, कमलाकांत गावडे, फिलोमिना डायस तसेच जिल्हा पंचायत सदस्य दीपक बोरकर हे उपस्थित होते. पंचसदस्य सुनिल सावकार व कॉस्तांसियो लुईस हे अनुपस्थित होते. सचिव विराज नाईक यांनी मागील सभेचे इतिवृत्त सादर केले. यावेळी झालेल्या चर्चेत सुनिल नाईक, सुधीर शिंदे, देवानंद फडते, सदानंद गावडे, देविदास नाईक, देविदास किन्नरकर, शैलेश बोरकर, भालचंद्र भट, राहूल नाईक, प्रशांत नाईक व अन्य ग्रामस्थांनी भाग घेतला.