प्रतिनिधी/ शिरोडा
मुद्रा प्रतिष्ठान व श्री नवदुर्गा देवस्थान, बोरी प्रस्तुत ‘सिद्धनाथ स्त्री स्पंदन- पर्व 4’ हा संगीत कला व वारसा महोत्सव शनिवार 11 डिसें. रोजी बोरी येथील सिद्धनाथ पर्वतावर साजरा करण्यात येणार आहे. यंदा या महोत्सवाचे हे चौथे वर्ष असून स्त्री सामर्थ्याचा कला अविष्कार ही कार्यक्रमाची संकल्पना आहे. संगीत, नृत्य व कला क्षेत्रातील 13 महिला कलाकारांचा या महोत्सवात सहभाग असेल.
मुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद पैदरकर यांनी पत्रकार परिषदेत स्पंदनचा कार्यक्रम जाहीर केला. यावेळी नवदुर्गा देवस्थानचे अध्यक्ष श्याम प्रभूदेसाई व मुद्रा प्रतिष्ठानचे पदाधिकारी उगम पार्सेकर हे उपस्थित होते. बोरी येथील 1250 फूट उंचीवर असलेल्या निसर्गरम्य अशा स्वयंभू श्री सिद्धनाथ मंदिराच्या प्रांगणात हा कार्यक्रम होणार आहे. सायं. 5.30 वा. कार्यक्रमाची सुरुवात होईल. या संगीत कला महोत्सवात सतारवादक कल्याणी देशपांडे, तबलावादक मुक्ता रास्ते, बासरीवादक विलंदी कुलकर्णी, मृदंगवादक महिमा उपाध्याय, व्हायोलीनवादक प्रज्ञा देसाई, हार्मोनियमवादक आदिती गराडे, यांच्यासह कौशिकी जोगळेकर, नृत्य कलाकार वैष्णवी पै काकोडे, प्रेरणा पालेकर, गायिका प्राची जठार, नेहा उपाध्ये, मुग्धा गावकर व निवेदिका सिद्धी उपाध्ये यांचा सहभाग असेल.
कार्यक्रमाच्या पहिल्या भागात स्त्रीयांची समाजातील भुमिका या संकल्पनेवर आधारीत संगीतातील विविध रागांवर कथ्थक व भरतनाटय़मच्या माध्यमातून सादरीकरण होणार आहे. तर दुसऱया भागात नवरस, नवरंग व नवदुर्गा या संकल्पनेवर नऊ रागातील बंदिशीच्या माध्यमातून स्त्रीयांचे महत्त्व व सामर्थ्य दाखविण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांपासून स्वातंत्र्यवीर सावरकर अशा वीर पुरुषांना या कार्यक्रमातून मानवंदना देण्यात येणार आहे. कार्यक्रम श्रोत्यांसाठी खुला असून बोरी येथील स्वामी विवेकानंद हायस्कूलपासून सिद्धनाथ पर्वतावर जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात येणार आहे. श्रोते आपली खासगी वाहनेही घेऊन येऊ शकतात, असे आवाहन मिलिंद पैदरकर यांनी केले आहे.