बुंदेस्लिगा फुटबॉल : डॉर्टमंडच्या विजयात सांचोची हॅट्ट्रिक, अमेरिकेतील दंगलीचे जर्मनीत पडसाद
वृत्तसंस्था/ बर्लिन
मार्कस थुरम व ऍलासेन प्लीआ या दोघांनी मिळून नोंदवलेल्या तीन गोलांच्या आधारे बोरुसिया माँचेनग्लाडबाचने बुंदेस्लिगा फुटबॉलमधील सामन्यात युनियन बर्लिनचा 4-1 अशा गोलफरकाने धुव्वा उडवित तिसरे स्थान पुन्हा हस्तगत केले. या लीगमधील अजून पाच सामने बाकी आहेत. अन्य एका सामन्यात बोरुसिया डॉर्टमंडने प्रतिस्पर्ध्यावर 6-1 असा एकतर्फी विजय मिळविला. त्यांच्या सांचोने हॅट्ट्रिक नोंदवली.
22 वर्षीय थुरमने 41 व्या मिनिटाला प्लीआने पुरविलेल्या क्रॉस पासवर हेडरद्वारे गोल नोंदवून संघाचा दुसरा गोल नोंदवला. पण त्याआधी फ्लोरियन न्यूहॉसने 17 व्या मिनिटाला संघाचा पहिला गोल नोंदवला होता. अमेरिकेत मिनेसोटा येथे पोलिसांनी 46 वर्षीय जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मानेवर गुडघ्यांनी बराच वेळ दाब दिल्याने तो गतप्राण झाला. त्याच्या विरोधात तेथे जोरदार निदर्शने सुरू असून पोलिसांच्या हल्ल्यात बळी गेलेल्या या जॉर्जला थुरमने गोल नोंदवल्यानंतर गुडघे टेकून मानवंदना दिली. सेबॅस्टियन अँडरसनने उत्तरार्धातील पाचव्या मिनिटाला युनियन बर्लिनचा एकमेव गोल नोंदवून बोरुसियाची आघाडी कमी केली. पण ग्लाडबाचने शानदार खेळ करीत अनेक संधी निर्माण करीत वर्चस्व गाजवले.
प्रेक्षकांविना खेळविण्यात आलेल्या या सामन्यात चाहत्यांचे कटआऊट्स स्टँड्समध्ये ठेवण्यात आले होते. 1998 मधील विश्वचषक जिंकणाऱया फ्रान्स संघातील लिलियन थुरमचा मुलगा मार्कस थुरमने 60 व्या मिनिटाला वैयक्तिक दुसरा गोल नोंदवला. यावेळी प्लीआनेच त्याला पास पुरविला होता. त्यानंत प्लीआने स्वतःच गोल नोंदवून ग्लाडबाचची आघाडी 4-1 अशी केली. या मोसमात थुरम व प्लीआ यांचे प्रत्येकी दहा गोल झाले आहेत. ग्लाडबाचचा हा तीन सामन्यातील पहिला विजय होता. या विजयानंतर ग्लाडबाचचे 56 गुण झाले असून सरस गोलसरासरीच्या आधारे त्यांनी बायर लिव्हरकुसेनला मागे टाकले आहे. लीपझीग 55 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. बायर्न म्युनिच 67 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.
डॉर्टमंडच्या विजयात सांचोची हॅट्ट्रिक
अन्य एका सामन्यात बोरुसिया डॉर्टमंडने जेडन सांचोने नोंदवलेल्या हॅट्ट्रिकच्या जोरावर पेडरबॉर्नचा 6-1 असा फडशा पाडला. सांचोची ही कारकिर्दीतील पहिली हॅट्ट्रिक आहे. या विजयानंतर त्यांनी बायर्न म्युनिचची आघाडी 7 गुणांवर आणली आहे. सांचोने बुंदेस्लिगाच्या या मोसमात 17 गोल नोंदवले तर 17 गोलसाठी मदत केली आहे. अमेरिकेत पोलिसांच्या हल्ल्यात बळी गेलेल्या जॉर्ज फ्लॉईडला न्याय मिळावा, यासाठी अमेरिकेत निदर्शने सुरू असून जर्मनीतही त्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी निदर्शने सुरू आहेत. त्याला सांचोनेही पाठिंबा दर्शविला. डॉर्टमंडचा चौथा गोल नोंदवल्यानंतर अश्रफ हकिमीनेही फ्लॉईडला न्याय देण्याचा संदेश लिहिलेली जर्सी उंचावून दाखवत निषेध नोंदवला.