प्रतिनिधी / मडगाव
दहावीच्या परीक्षेत शनिवारी झालेल्या इंग्रजी प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आलेले पोर्तुगीज पासपोर्ट व नोकरीसाठी विचारण्यात आलेले प्रश्न हे पूर्णपणे आक्षेपार्ह असून गोवा बोर्डाने सदर पेपर सेटर व या पेपरची छाननी करणाऱयावर ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी प्रदेश भाजपचे सरचिटणीस ऍड. नरेंद्र सावईकर यांनी केली आहे. दुसऱया बाजूने विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी असे प्रश्न उपस्थित करण्यात आल्याने गोव्याच्या सद्य परिस्थितीवर प्रकाश पडला असल्याचे म्हटले आहे.
गोवा पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त होऊन 59 वर्षे झाली तरी काहीजणांची मानसिकता अजूनही बदलेली दिसत नाही. आपला अजेन्डा विद्यार्थ्यांच्या माथी थोपवण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न असून भावी पिढीची मने कलुषित करण्याचा हा प्रयत्न आहे. गोवा बोर्डाने इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या प्रक्रियेत गुंतलेल्या सर्वावर कडक कारवाई करावीच, त्याचबरोबर भविष्यातही त्यांना बोर्डाचे पेपर सेट करण्याच्या प्रक्रियेत कधीही सहभागी करून घेऊ नये अशी मागणी ऍड. सावईकर यांनी केली आहे.
सद्याच्या परिस्थितीवर प्रकाश : दिगंबर कामत
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी ट्विट करताना म्हटले आहे की, प्रश्नपत्रिकेत उपस्थित झालेल्या प्रश्नावरून गोव्याच्या सद्याच्या परिस्थितीवर प्रकाश पडला आहे. गोव्यात नोकरी मिळण्याची शाश्वती नसल्याने गोव्यातील युवा पिढी विदेशात जात आहे. गोव्याच्या अर्थव्यवस्थेला मदत करीत आहे. मात्र, त्यांना सावत्र वागणूक दिली जात आहे. गोव्याचे मुख्यमंत्री याची नोंद घेतील, असे त्यांनी नमूद केले आहे.