पुलाची शिरोली / वार्ताहर
महिंद्रा बोलेरो पिकअप माल वहातुकीची गाडी अंगावरुन गेल्यामुळे तीन वर्षाची मुलगी जागीच ठार झाली. दिपा रामजी शर्मा असे मयत झालेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी राजू बाळू देसाई या चालकावर शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना पुलाची शिरोलीतील सनद माळावरील अन्वर स्क्रॅप डेपो समोर बुधवारी राञी साडे आठच्या सुमारास घडली.
शिरोली पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रामजी जोखू शर्मा वय वर्षे ३५ मुळगाव मंडश्री रामगड ता. भवानीपूर, जि. पटणा , राज्य बिहार हे नोकरी निमित्ताने शिरोली गावात रहात आहेत. बुधवारी रात्री त्यांची मुलगी दिपा ही दारात खेळत होती. दरम्यान राजू देसाई हे बोलेरो महिंद्रा एम एच ०९ सीए / ९२८८ या मालवाहतूक गाडीतून स्क्रॅप घेऊन आला होता. ती गाडी डेपोमध्ये लावण्यासाठी पाठीमागे न पहाता गाडी जोरात रिव्हर्स आणली. यावेळी ती गाडी दिपाच्या अंगावर गेली. यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.
याची फिर्याद तिचे वडील रामजी शर्मा यांनी गुरुवारी शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिली आहे.पुढील तपास स.पो.नि. राजेश खांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी श्री. चौरे हे करीत आहेत.