वृत्तसंस्था/ साराजेव्हो
युरो चषक फुटबॉल स्पर्धेतील 2020 च्या होणाऱया प्ले ऑफ लढतीतील सामन्यांना त्याचप्रमाणे हॉलंडमधील नेशन्स लिग फुटबॉल स्पर्धेसाठी बोस्निया शासनाने शौकिनांच्या संख्येवर निर्बंध घातले असून केवळ 2 हजार शौकिनांना उपस्थितीची परवानगी दिली आहे.
बोस्निया आणि उत्तर आयर्लंड यांच्यातील युरो पात्र फेरी स्पर्धेतील प्ले ऑफचा सामना बोस्नियामध्ये होणार आहे. कोरोना महामारी समस्येमुळे युफाने विविध स्पर्धातील सामन्यांना प्रेक्षकांच्या उपस्थितीला बंदी घातली होती. अनेक सामने यापूर्वी प्रेक्षकांविना बंदिस्त स्टेडियमध्ये खेळविले गेले होते. गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत पुन्हा युरोपियन फुटबॉल स्पर्धांना प्रारंभ झाला आहे. या विविध स्पर्धांमधील सामन्यांना प्रेक्षकांच्या उपस्थितीला काही प्रमाणात परवानगी देण्याचा निर्णय युफाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. बोस्निया आणि उत्तर आयर्लंड यांच्यातील सामना 8 ऑक्टोबरला होणार आहे. त्यानंतर बोस्नियाचा पुढील सामना हॉलंडबरोबर 11 ऑक्टोबरला खेळविला जाईल. युरोपियन फुटबॉल स्पर्धेमध्ये स्टेडियमच्या क्षमतेचा आढावा घेतल्यानंतर केवळ 30 टक्के शौकिनांना उपस्थितीसाठी हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे.