अस्मिता मोहिते / सातारा :
ज्या काळात ब्युटी पार्लर ही संकल्पना अधिकतर नागरिकांना अवगतही नव्हती अशा काळात स्वाती ओक यांनी या क्षेत्रात खंबीरपणे पाऊल रोवले आणि अगदी शून्यातुन ‘इम्प्रेशन ब्युटी पार्लर’ हे छोटेसे विश्वही निर्माण केले आहे. महिलांनी केवळ चूल आणि मुल इतक्यात मर्यादित न राहता, स्वत:च्या आरोग्याकडे तसेच विशेषत: सौदर्याकडे ही तितकेच लक्ष देणे गरजेचे आहे. आपण सुंदर दिसावं अन् महिलांनाही सुंदर बनवावं हे ध्येय मनाशी पक्कं करून तसेच ब्युटी पार्लर या क्षेत्राची आवड असल्याने सातारा शहरात स्वाती ओक यांनी पदार्पण केले. मागील 25 वर्षाहुन अधिक काळ त्या या क्षेत्राशी निगडीत असुन त्यांनी अनेक महिलांसाठी त्यांनी रोजगाराची संधी ही मिळवुन दिली. त्यांच्या एकंदरीत कार्याची दखल घेत त्यांना सातारा ब्युटी असोशिएशनच्या खजिनदारपदी कार्यरत आहेत.
स्वाती ओक यांचे वडील बाळकृष्ण जोशी हे बँक ऑफ बडोदात असिस्टंट मॅनेजर या पदावर कार्यरत होते. तर आई स्मिता जोशी या गृहिणी होत्या. त्यामुळे इतरांच्या आई वडिलांप्रमाणे त्यांच्याही पालकांना त्यांनी उच्च शिक्षण घेऊन त्यांनी विद्याभुषित व्हावे अशीच अपेक्षा होती. पण स्वाती यांना अगदी लहानपणापासूनच सौंदर्य आणि सौंदर्य प्रसादना विषयी अधिक ओढा होता. त्या शालेय शिक्षण घेत असताना ही विविध सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान मैत्रिणी विविध प्रकारचे सौंदर्य प्रसादनांचा प्रयोग करुन त्यांचे सौंदर्य अधिक असे खुलेले याकडे लक्ष देत होत्या. त्यामुळे त्यांनी आपण याच क्षेत्रात काही तरी करायचे असे ध्येय बाळगले होते. पण प्रारंभी त्यांच्या घरच्यांचा याला विरोध होता.
त्यातच बीकॉमचे शिक्षण घेत असताना सन 1993 साली त्यांचे ऍड. मिलिंद ओक यांच्याशी विवाह झाला. त्यानंतर त्यांनी आपली कौटुंबिक जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडत स्वत:च्या कलागुणांनाही वाव दिला. त्याकरिता त्यांनी योग्य प्रशिक्षण ही घेणे गरजेचे ठरवुन प्रारंभी शासकीय आयटीआयच्या येथे असणाऱ्या ब्युटी पार्लर विषयी कोर्स सुरू केला. त्यानंतर मिटकॉनचे महेश कुलकर्णी यांच्याकडे ऍडव्हॅन्स कोर्स केला. इतक्यातच समाधान न मानता त्यांनी उद्योगवर्धिनी महिला विकास संस्थेतून विविध असे 25 प्रकारचे कोर्सेस केले. प्रारंभी ब्युटी पार्लरचा कोर्स करण्यासाठीची फी देणे ही त्यांना शक्य नव्हते. कारण घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्यादरम्यान त्यांचे पती ऍड. मिलिंद यांची त्यांना वेळोवेळी चांगली साथ मिळाली. याचेच फलित म्हणून सन् 2004 साली त्यांनी साताऱयात प्रथमच पार्लर ही संकल्पना उभी केली.
त्यांनी स्वत:ची ‘इंप्रेशन प्लस’ ही पोवई नाका येथे महिलांसाठी स्वयंरोजगारची एक नवी दिशा दाखविणारी संस्था उभी केली आहे. याअंतर्गत तीन हजार अधिक मुलींना शिक्षण दिले आहे. काहीतरी करण्याची जिद्द असणाऱ्या गरजु विद्यार्थीनींच्या पाठीशी त्या नेहमी खंबीरपणे उभ्या असतात. त्यांच्या या आपुलकीमुळेच कित्येक विद्यार्थीनींनी स्वत:च्या पार्लरला त्यांचे नावही दिले आहे. तसेच त्यांचे फोटोही त्यांनी पार्लरमध्ये लावले आहेत.
सामाजिक कार्य
स्वाती यांनी अनेक सामुदायिक विवाह सोहळय़ात मोफत मेकअप केले आहेत, व आजतागायत करतात. तसेच बालनिरिक्षण गृहामध्ये मुलींचे हेअर कटिंग त्यांना शॅम्पो, कंडीशनर सारखे साहित्य भेट स्वरूपात देतात. इन्स्टुटय़ूटमधील प्रत्येक बॅचमध्ये किमान दोन मुलींना त्या मोफत प्रशिक्षण देतात. त्याचबरोबर ब्युटी संकल्पनेविषयी जनजागृती करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह, इतर राज्यातही त्यांचे सेमिनार झाले आहेत. काही कंपन्यांमध्ये महाराहष्ट्राबाहेरही काम केले असल्याने त्यांना संबंधित कंपन्यांनी त्यांना ब्रँड अम्बेसिडर ही नेमले आहे. तसेच त्यांना अनेक पुरस्काराने ही गौरविण्यात आले आहे.
कौटुंबिक जबाबदारीही सक्षम पणे सांभाळली
सौ. स्वाती यांनी छंद जोपासताना कुटुंबाची जबाबदारी ही अगदी सक्षमणे सांभाळली आहेत. त्यांची दोनीही मुले उच्चविभुषित असून मोठ्ठा मुलगा मेघदीप हा हायकोर्टात प्रॅक्टीस करतो, तर लहान मुलगा आकाश याने व्हिडीओ गेम डिझायनिंग हे क्षेत्र निवडले असून सध्या याच्या मास्टर कोर्सससाठी तो लंडन येथे आहे.
महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद महत्वाचा
आयुष्यात येणारे अनुभव आपल्याला बरंच काही शिकवून जातात. या अनुभवातूनच आपण काय शिकतो ते महत्वाचं असतं. मला काही तरी मोठ्ठं करून दाखवायचं होतं, सुसज्ज असं ब्युटी पार्लर उभारण्याचं स्वप्न मनी बाळगुन स्वयंस्फूर्तीने अभ्यासाचे मार्ग शोधले. तसेच माझ्याकडे शिक्षणाकडे येणाऱया मुलींना अभ्यासानं तयार करायचं मी ठरवलं. आजपर्यंत तीन हजाराहून अधिक मुलींना मी शिक्षण दिले असून त्या स्वत:च्या पायावर खंबीरपणे उभ्या आहेत. तसेच हा व्यवसाय करताना केवळ पैसा महत्वाचा न मानता महिलेच्या चेहऱयावरील आनंद महत्वाचा मानला.
– स्वाती ओक