प्रतिनिधी/ फोंडा
कुंडई तपोभूमीच्या श्री दत्तपद्मनाभ पिठाचे पिठाधीश प. पू. ब्रह्मेशानंद स्वामीजींनी नुकतीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री महंत योगी आदित्यनाथ यांची लखनऊ येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. अयोध्या येथील श्रीराम मंदिराची निर्मिती व हिंदू धर्म आणि संस्कृतीविषयी त्यांच्यात चर्चा झाली. हिंदू धर्म आचार्य सभेच्या प्रमुख सदस्यांसोबत स्वामी ब्रह्मेशानंदानी ही भेट घेतली.
योगी आदित्यनाथ यांनी गोव्यात सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींकडून गोव्यात सुरु असलेल्या अध्यात्मिक व अन्य विविध क्षेत्रातील कार्याविषयी जाणून घेतले. उत्तर प्रदेश सरकारकडून स्वामीजींना यावेळी गौरविण्यात आले. त्यानंतर हिंदू धर्म आचार्य सभेतील सर्व संत महंतांनी अयोध्येला जाऊन श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण स्थानी श्रीराम लल्लांचे दर्शन घेतले. मंदिर निर्मितीच्या कार्याची पाहणी केली. या भेटी दरम्यान हिंदू धर्म आचार्य सभेचे संयोजक स्वामी परमात्मानंद, मुंबई येथील महामंडलेश्वर विश्वेश्वरानंद स्वामी, वृंदावन येथील स्वामी ज्ञानानंदजी, गुजरात येथील शास्त्रीय माधव प्रियदासजी, कृष्णमणीजी, श्री शंभूनाथजी, श्री योगराजजी आदी संत महंत उपस्थित होते.