वृत्तसंस्था/ सावोपावलो
फिफा 2022 विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रतेकरिता सध्या सुरू असलेल्या पात्र फेरीच्या स्पर्धेतील सामन्यात शुक्रवारी ब्राझिलने व्हेनेझुएलाचा तर उरुग्वेने कोलंबियाचा पराभव करत पूर्ण गुण वसूल केले.
येथे शुक्रवारी झालेल्या सामन्यात व्हेनेझुएलाने बलाढय़ ब्राझिलला कडवी लढत दिली. मध्यंतरापर्यंत गोलफलक कोराच होता. दरम्यान, सामन्याच्या उत्तरार्धात रॉबर्टो फिरमेनो याने ब्राझिलचा एकमेव निर्णायक गोल नोंदवित व्हेनेझुएलाचे आव्हान संपुष्टात आणले. पात्र फेरीच्या या स्पर्धेत यापूर्वी झालेल्या शेवटच्या दोन सामन्यात बलाढय़ ब्राझिलने प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध 9 गोल नोंदविले होते.
व्हेनेझुएलाच्या भक्कम बचाव फळीमुळे ब्राझिलच्या अनेक चढाया फोल ठरल्या. सामन्यातील सातव्या मिनिटाला रिचार्लसनने गोल करण्याची नामी संधी वाया घालविली. व्हेनेझुएलाच्या आघाडी फळीने ब्राझिलच्या चढायांना चोख प्रत्युत्तर दिल्याने मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांकडून गोल होऊ शकला नाही. पण उत्तरार्धात फिरमेनोच्या एकमेव गोलाने ब्राझिलला हा सामना जिंकण्याची संधी मिळाली.
या विजयामुळे ब्राझिलने आता या पात्र फेरीच्या स्पर्धेत 9 गुण घेतले आहेत. दक्षिण अमेरिकन गटातून आता ब्राझिलचा संघ तीन सामन्यांनंतर आघाडीवर आहे. व्हेनेझुएला आणि पेरू हे अनुक्रमे दुसऱया आणि तिसऱया स्थानावर आहेत.
पात्र फेरीच्या या स्पर्धेतील शुक्रवारी झालेल्या अन्य एका सामन्यात उरुग्वेने कोलंबियाचा 3-0 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला. या सामन्यात उरुग्वेचे खाते 5 व्याच मिनिटाला एडीनसन कॅव्हेनीने उघडले. मध्यंतरापर्यंत उरुग्वेने 1-0 अशी आघाडी मिळविली होती. खेळाच्या उत्तरार्धात लुईस सुआरेझने पेनल्टीवर उरुग्वेचा दुसरा गोल नोंदविला. या पात्र फेरीच्या स्पर्धेत सुआरेझचा तीन सामन्यातील हा चौथा गोल होता. 73 व्या मिनिटाला डार्विन नुनेझने उरुग्वेचा तिसरा गोल नोंदवून कोलंबियाचे आव्हान एकतर्फी संपुष्टात आणले. या विजयामुळे उरुग्वेने आता तीन सामन्यातून 6 गुण मिळविले आहेत. तर कोलंबिया 4 गुणांसह दुसऱया स्थानावर आहे. आता उरुग्वेचा पुढील सामना ब्राझिलबरोबर तर कोलंबियाचा पुढील सामना इक्वेडोरबरोबर येत्या मंगळवारी होणार आहे.