76 हजारांहून अधिक मृत, जगभरातील एकंदर बाधित 1,38,05,296, मृतांची संख्या 5,89,911
रिओ डी जानेरो :
अमेरिकेखालोखाल कोरोनाचा सर्वाधिक उदेक ब्राझिलमध्ये होत असून या देशातील एकंदर रुग्णांची संख्या 20 लाखाहून अधिक झाली आहे. तर मृतांची संख्या 76 हजाराहून अधिक आहे. गेले पंधरा दिवस दररोज सरासरी 1 हजार आठ जणांचा मृत्यू होत आहे. तर रुग्णांच्या संख्येत सरासरी 25 हजारांहून अधिक भर पडत आहे. ब्राझिलमधील मृत्यूदरही इतर देशांच्या तुलनेत जास्त आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला ब्राझिल सरकारचे धोरण कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. लॉकडाऊन घोषित करण्यास झालेला उशिर, लॉकडाऊनच्या काळात नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यात आलेले अपयश तसेच सर्वसामान्य जनतेत कोरोनाच्या गांभीर्याची जाणीव लवकर निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात कुचराई यामुळे उदेक वाढला आहे.
जनजागृती करण्यासाठी झालेले प्रयत्न अपुरे असण्याबरोबरच आता ब्राझिलमध्ये रुग्णालये आणि आरोग्यसेवा यांची अनुपलब्धता जाणवू लागली आहे. व्हेंटिलेटर्सची संख्या मागणीपेक्षा कमी असल्याने कित्येक रुग्णांचा धोका अधिकच वाढला आहे. सध्या ब्राझिलमध्ये 50 हजाराहून अधिक लोक कृत्रिम ऑक्सिजन पुरवठय़ावर जिवंत आहेत. लवकर रुग्णसंख्या आटोक्मयात न आल्यास मृतांची संख्या झपाटय़ाने वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
लॉकडाऊनला जनतेचाच विरोध
कठोर नियमांसह लॉकडाऊन पाळण्यास ब्राझिलमधील जनता विरोध करीत आहे. कठोर नियमांमुळे आपल्या मुक्त जीवनशैलीवर बंधने येतील, अशी भीती त्यांना वाटत आहे. कोरोनामुळे आपली मुक्त जीवनशैली बदलण्यास ब्राझिलमध्ये अनेक भागामधील लोकांचा विरोध असल्याने प्रशासनाचाही नाईलाज होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सरकारची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे. ब्राझिलच्या 19 प्रांतांमध्ये स्थानिक प्रशासनांनी कोरोनासमोर हात टेकल्याचा आरोप तेथील विचारवंत करीत आहेत.
लसीवर संशोधनही नाही
अमेरिका, ब्रिटन, चीन, रशिया आणि भारतातही कोरोना विरुद्धच्या लसीवर जोरदार संशोधन सुरू आहे. तथापि, ब्राझिलमध्ये या संशोधनाचाही अभाव दिसून येतो. परिणामी इतर देशात प्रभावी लस निर्माण होण्यावर ब्राझिलमधील कोरोनाचे नियंत्रण अवलंबून असल्याने यासंदर्भात हा देश परावलंबी असल्याचे दिसत आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण या देशात आहे.
लस संशोधन चोरण्याचा प्रयत्न?
वॉशिंग्टन : आपल्या लस संशोधनाची माहिती चोरण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अमेरिका आणि ब्रिटनने रशियावर केला आहे. काही दिवसांपूर्वी रशियाने कोरोना लस यशस्वीरीत्या तयार केल्याचा आणि मानवांवर तिचे यशस्वी प्रयोग केल्याचा दावा केला होता. ऑगस्टच्या मध्यापर्यंतच कोरोनावरील 100 टक्के प्रभावी लस सादर केली जाईल, अशी घोषणा रशियाच्या अधिकाऱयांकडून करण्यात आली होती. मात्र, संशोधन चोरीच्या प्रयत्नाचा आरोप झाल्याने रशियाच्या लसीकडे जग संशयाच्या नजरेने पाहाण्याची शक्मयता आहे. रशियाने मात्र या सर्व आरोपांचा इन्कार केला असून कोरोनाची लस हे स्वतःचेच संशोधन असल्याचे म्हटले आहे.
जपानमध्ये योजना फोल
टोकियो : जपानमध्ये कोरोना विषाणू प्रादुर्भाव नियंत्रणात आहे. त्यामुळे तेथील सरकारने पर्यटन विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान घोषित केले होते. तथापि, या अनुदानालाही स्थानिक पर्यटकांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. जपानमधील शहरवासियांना पर्यटन प्रिय आहे. तथापि, कोरोनाची लागण होईल या भीतीमुळे नेहमी उत्साहात पर्यटन करणारे नागरिकही कार्यालय ते घर अशी बंदिस्त जीवनशैली स्वीकारत आहेत.
अमेरिकेत नवा उच्चांक
वॉशिंग्टन : बुधवार सकाळपासून सुरू झालेल्या 24 तासांमध्ये अमेरिकेत 77 हजारहून अधिक नवे रुग्ण आढळून आल्यामुळे नवा उच्चांक प्रस्थापित झाला आहे. यापैकी 20 टक्के नवे रुग्ण एकटय़ा टेक्सास प्रांतातील आहेत. न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टनमध्येही रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ होत असल्याने स्थानिक प्रशासनांनी काही भागांमध्ये लॉकडाऊनचा प्रयोग पुन्हा सुरू केला आहे. सुरू केला आहे. अशी स्थिती असतानाही मास्कच्या उपयोगाबद्दल प्रांतीय सरकारे आणि व्हाईट हाऊस यांच्यात एकमत होताना दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अमेरिकेतही लॉकडाऊनचे स्वागत लोकांनी उत्साहाने केलेले नाही.
हॉटेले टेबलाविना
तेल अविव : लोकांनी हॉटेलातील टेबलांभोवती गर्दी केल्याने कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी इस्रायलमधील हॉटेल चालकांनी टेबलेच काढून टाकण्याचा अनोखा प्रयोग केला आहे. त्याचप्रमाणे हॉटेल्समधील वेटर्सनाही रजा देण्यात आली आहे. परिणामी ग्राहकांना स्वत: होऊन काऊंटरवरून खाद्यपदार्थांच्या बशा घेऊन उभ्या उभ्या खाण्याचा आस्वाद घेण्याची वेळ आली आहे. खाद्यपदार्थांच्या ऑर्डर देण्यासाठीही टचस्क्रिन यंत्रणेची सोय करण्यात आली आहे. एकंदर लोकांचा एकमेकांना कमीत कमी स्पर्श व्हावा, असे प्रयत्न करण्यात येत आहेत.
पर्यटकांना अनुमती
मनिला : काही देशातील पर्यटकांना ऑगस्टपासून आपल्या देशात येऊ देण्याची योजना फिलीपाईन्स प्रशासनाने आखली आहे. गेले तीन महिने या देशात कडक लॉकडाऊन असल्याने सर्व आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे बंद करण्यात आली होती. फिलीपाईन्सची अर्थव्यवस्था 12 टक्के प्रमाणात पर्यटनावर अवलंबून आहे.
जी-20 परिषदेला आवाहन
वॉशिंगन : गरीब देश कोरोनाच्या संकटाशी दोन हात करण्यात कमी पडत असल्याने त्यांना घसघशीत आर्थिक साहाय्य करावे, असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे. संघटनेने स्वतः गरीब देशांच्या आर्थिक साहाय्यात वाढ केली असून 63 देशांसाठी 10.3 अब्ज डॉलर्स देण्याची घोषणा केली. या देशांमध्ये प्रामुख्याने आफ्रिका व दक्षिण अमेरिका देशांचा समावेश आहे.