कोपा अमेरिका फुटबॉल ः दुबळय़ा प्रतिस्पर्ध्यावर 3-0 गोल्सनी एकतर्फी मात
वृत्तसंस्था/ ब्रासिलिया
यजमान ब्राझीलने कोपा अमेरिका 2021 स्पर्धेची विजयी सुरुवात करताना दुबळय़ा व्हेनेझुएला संघाचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. अननुभवी खेळाडूंचा भरणा असलेल्या प्रतिस्पर्ध्यावर ब्राझीलने प्रारंभापासून अखेरपर्यंत वर्चस्व गाजविले.
पूर्वार्धाच्या मध्यास डिफेंडर मार्क्विन्होसने ब्राझीलला आघाडी मिळवून दिली. त्याने मारलेला बॅकहील फटका बचावपटूच्या पायामधून थेट जाळय़ात गेल्याचे त्याला पहावयास मिळाले. त्यानंतर नेमारने दुसऱया सत्रातील 19 व्या मिनिटाला पेनल्टी स्पॉटवर संघाचा दुसरा गोल नोंदवला. त्याचा हा 67 वा आंतरराष्ट्रीय गोल होता. बॉक्स क्षेत्रात डॅनिलोवर फाऊल केल्याने ब्राझीलला हा पेनल्टी मिळाला होता. सामना संपण्यास दोन मिनिटे असताना बदली खेळाडू म्हणून उतरलेल्या गॅब्रियल बार्बोसाने तिसरा गोल केला. नेमारने पुरविलेल्या क्रॉसला चेस्ट करून बार्बोसाने चेंडूला गोलजाळय़ात मारले.
कोलंबियात नागरी आंदोलन सुरू असल्याने त्यांचे या स्पर्धेचे सहयजमानपद काढून घेण्यात आले. तसेच अर्जेन्टिनाने कोव्हिड 19 चा प्रकोप वाढल्याने यजमानपदातून माघार घेतल्याने केवळ दोन आठवडे बाकी असताना ही स्पर्धा ब्राझीलमध्ये भरविण्याचा निर्णय घेतला गेला. या तीनही देशांचा एकही खेळाडू किंवा पदाधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला नाही. मात्र व्हेनेझुएलाच्या 8 खेळाडूंना लागण झाल्याने त्यांना पहिल्या सामन्याच्या आदल्या दिवशी 15 नव्या खेळाडूंना सामील करून घ्यावे लागले. गेल्या मंगळवारी व्हेनेझुएलाचा विश्वचषक पात्रता फेरीतील सामना उरुग्वेविरुद्ध झाला होता. त्यातील फक्त तीन खेळाडू या संघात राहिले असून दोन नव्या खेळाडूंना येथील सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली. व्हेनेझुएलाने आजवर एकदाही ब्राझीलला हरविलेले नाही. अन्य एका सामन्यात कोलंबियाने इक्वेडोरचा 1-0 असा पराभव केला.
ब्राझीलचे या सामन्यावर वर्चस्व राहिले असले तरी त्यांनी अनेक संधी वाया घालविल्या. ब्राझीलचा पुढील सामना 17 जून रोजी पेरूविरुद्ध तर व्हेनेझुएलाचा सामना त्याच दिवशी कोलंबियाविरुद्ध होणार आहे. इक्वेडोर हा गट ब मधील पाचवा संघ आहे.