देशाची स्थिती समजत नसल्याचा अध्यक्ष बोल्सोनारो यांचा दावा : जगभरात 70,04,013 कोरोनाबाधित
जगभरातील कोरोना संसर्ग बळींचा आकडा 4,02,660 वर पोहोचला आहे. तर बाधितांचे प्रमाण 70,04,013 झाले आहे. ब्राझीलने कोरोनाशी संबंधित आकडेवारी संकेतस्थळावरून हटविली आहे. या संकेतस्थळावर देशातील बाधितांचा आकडा, बळी आणि बरे झालेल्यांची संख्या नमूद होती. देशाच्या आरोग्य मंत्रालयाने बाधितांचे एकूण प्रमाण जाहीर करणे बंद केले आहे. कोरोनाचे वाढते आकडे देशातील सद्यस्थिती दर्शवित नसल्याचा दावा ब्राझीलचे अध्यक्ष जायर बोल्सोनारो यांनी केला आहे.
राजपुत्र विलियम यांचे सेवाकार्य
ब्रिटनचे राजपुत्र विलियम हे कोरोनाशी संबंधित समस्यांशी निर्माण करण्यात आलेल्या हेल्पलाईनमध्ये स्वयंसेवक म्हणून सेवा बजावत आहेत. त्यांनी वॉलंटियर्स वीक समाप्त झाल्यानिमित्त एका व्हिडिओ कॉलमध्ये स्वतःच यासंबंधी माहिती दिली आहे. राजपुत्र विलियम यांनी देशात सेवा बजावत असलेल्या सर्व स्वयंसेवकांच्या कामांचे कौतुक केले आहे.
चीनमध्ये 6 नवे रुग्ण
चीनमध्ये मागील 24 तासांमध्ये 6 नवे रुग्ण सापडले आहेत. तर एकाही बाधिताला जीव गमवावा लागलेला नाही. नव्या 6 बाधितांपैकी 6 जण विदेशातून परतले होते. तसेच 5 लक्षणेरहित रुग्ण सापडल्याची माहिती चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिली आहे. चीनने कोरोनाच्या संसर्गावर आता बऱयापैकी नियंत्रण मिळविले आहे. चीनमध्ये आतापर्यंत 83,036 बाधित आढळले असून 4,634 जणांना जीव गमवावा लागला आहे.
पाक : लाखासमीप
पाकिस्तानात रविवारी बाधितांचा आकडा 1 लाखासमीप पोहोचला आहे. देशात आतापर्यंत 2,002 जणांना जीव गमवावा लागला आहे. मागील 24 तासांमध्ये 4 हजार 960 नवे बाधित सापडले आहेत. रुग्णसंख्या वाढती असूनही पंतप्रधान इम्रान खान यांनी कठोर लॉकडाउन लागू करणार नसल्याचे म्हटले आहे.लॉकडाउनमुळे देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होईल आणि गरीबी वाढणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. पाकिस्तानात 98,943 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
मेक्सिकोत रुग्ण वाढले
मेक्सिकोमध्ये मागील 24 तासांमध्ये 3,600 नवे बाधित सापडल्याने एकूण आकडा 1,13,619 वर पोहोचला आहे. देशात आतापर्यंत 13,511 जणांना जीव गमवावा लागला आहे. 1 हजार 189 संशयित मृत्यूंचीही तपासणी केली जात असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
चर्चमध्ये प्रार्थनेस अनुमती
ब्रिटन सरकारने 15 जूनपासून लोकांना चर्चमध्ये प्रार्थना करण्याची अनुमती दिली आहे. परंतु याकरता संबंधिताला एकटेच जावे लागणार आहे. लोकांना घरात तयार खाद्यपदार्थ बाहेर खाण्याची आणि विवाह सोहळय़ांमध्ये सामील होण्याची मंजुरी देण्याचा विचार सुरू आहे. परंतु सरकारने अनेक हिस्स्यांमध्ये अद्याप शाळा न सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
न्यूयॉर्कमध्ये बळी घटले
न्यूयॉर्कमध्ये दिवसभरात 35 बाधितांचा मृत्यू झाला आहे. हे प्रमाण मागील दोन महिन्यातील सर्वात कमी आहे. तर एक दिवसापूर्वी तेथे 42 जणांना जीव गमवावा लागला होता. पूर्वीच्या तुलनेत ही एक चांगली बातमी असल्याचे उद्गार महापौर ऍन्ड्रय़ू क्यूमो यांनी काढले आहेत. न्यूयॉर्कमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.
द. कोरियात 57 नवे रुग्ण
दक्षिण कोरियात मागील 24 तासांमध्ये 57 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. रविवारी सलग दुसऱया दिवशी तेथे 50 पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. कोरियाच्या डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन सेंटरने याची माहिती दिली आहे. नवे रुग्ण समोर आल्यावर ग्रेटर सोल भागात नवे क्लस्टर मिळण्याची चिंता वाढली आहे. देशात आतापर्यंत 11 हजार 776 रुग्ण सापडले असून 273 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 10 हजार 552 बाधितांनी संसर्गापासून मुक्ती मिळविली आहे.
नागरी उड्डाण क्षेत्राला मदत
ऑस्ट्रेलिया सरकारने देशातील नागरी उड्डाण क्षेत्राला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. याकरता 9,067 हजार कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज दिले जाणार आहे. या निधीसहाय्यातून ऑस्ट्रेलियाच्या एअरलाईन्स ऑपरेटर आवश्यक सेवा सुरू ठेवू शकतील असे उपपंतप्रधान मॅककॉमार्क यांनी म्हटले आहे. संसर्गाशी संबंधित निर्बंध हटविण्यात आल्यावर लोक देशांतर्गत विमानसेवेचा लाभ घेऊ शकतील. लवकरच हे निर्बंध हटविण्यात येणार आहेत.