रिओ डी जानेरो : गेल्या आठ सामन्यात प्रथमच पिछाडीवर पडलेल्या ब्राझीलने कोपा अमेरिका स्पर्धेतील सामन्यात वादग्रस्त गोलवर बरोबरी साधली आणि स्टॉपेज टाईममध्ये निर्णायक गोल नोंदवून कोलंबियावर 2-1 अशा गोलफरकाने विजय मिळविला. अन्य एका सामन्यात पेरूने दोन गोलांची पिछाडी भरून काढत इक्वेडोरला 2-2 असे बरोबरीत रोखले.
याआधीचे नऊ सामने जिंकून ब्राझील या लढतीत मैदानात उतरले होते. त्यापैकी एक सामना वगळता बाकीच्या सर्व सामन्यात त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना एकही गोल करू दिला नव्हता. येथील सामन्यात मात्र दहाव्याच मिनिटाला कोलंबियाने पहिला गोल नोंदवून ब्राझीलवर आघाडी घेतली. लुईस डायझने हा गोल नोंदवला.