वृत्तसंस्था/ साओ पॉलो
मर्सिडीजच्या जॉर्ज रसेलने येथे झालेल्या ब्राझिलियन ग्रां प्रि फॉर्म्युला वन शर्यतीचे जेतेपद पटकावले. त्याचे हे पहिलेच ग्रां प्रि जेतेपद आहे. त्याचाच संघसहकारी लेविस हॅमिल्टनने दुसरे तर फेरारीच्या कार्लोस सेन्झने तिसरे स्थान मिळविले.
24 वर्षीय इंग्लिश ड्रायव्हर रसेलने आपलाच सहकारी हॅमिल्टनकडून आलेला दबाव झटकून 1.529 सेकंदांनी त्याला मागे टाकत पहिले जेतेपद पटकावले. तिसरे स्थान मिळविणाऱया फेरारीच्या कार्लोसने आपलाच सहकारी चार्लस लेक्लर्कला मागे टाकले. दोनवेळचा विजेता अल्पाईनच्या फर्नांडो अलोन्सोने पाचवे, रेड बुलच्या मॅक्स व्हर्स्टापेनने सहावे, अल्पाईनच्या एस्टेबन ओकॉनने सातवे, रेड बुलच्याच सर्जिओ पेरेझने आठवे, अल्फा रोमिओच्या व्हाल्टेरी बोटासने नववे, ऍस्टन मार्टिनच्या लान्स स्ट्रोलने दहावे स्थान मिळविले. सेबॅस्टियन व्हेटेलला मात्र 11 व्या स्थानावर समाधान मानावे लागले.