ऑनलाईन टीम / ब्रासिलिया :
ब्राझीलच्या रिओ दि जानेरो शहरात ड्रग्ज माफिया आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत 28 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये काही निष्पाप लोकांसह एका पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे.
ड्रग्ज माफियांना पकडण्यासाठी ब्राझील पोलिसांनी गुरुवारी मोहिम राबविली होती. रिओ दि जानेरो शहरात एका ठिकाणी पोलिसांनी धाड टाकली असता ड्रग्ज माफियांनी घरांच्या छतावरुन पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या ड्रग्ज माफियांना पकडण्यासाठी जय्यत तयारी केली होती. पोलिसांच्या ताफ्यात चिलखती गाडय़ांसह हेलिकॉप्टरही होते. दरम्यान, पोलीस आणि ड्रग्ज माफियांमध्ये चकमक सुरू झाली, तेव्हा नागरिक आपापल्या घरात लपून बसले होते. तरीही या चकमकीत अनेक निष्पाप नागरिक मारले गेले. या घटनेचा तीव्र निषेध करत मागील 16 वर्षातील ही सर्वात क्रूर घटना असल्याचे ब्राझीलमधील मानव अधिकार संघटनेने म्हटले आहे.