वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
येथे सुरू झालेल्या एटीपी टूरवरील वेस्टर्न आणि सदर्न पुरूषांच्या खुल्या टेनिस स्पर्धेत ब्रिटनचा माजी टॉप सीडेड टेनिसपटू अँडी मरेने एकेरीत विजयी सलामी दिली. 31 ऑगस्टपासून सुरू होणाऱया अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेपूर्वीची ही सरावाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. महिला विभागात अमेरिकेची व्हिनस विलीयम्स आणि गॉफ यांचे आव्हान पहिल्या फेरीत समाप्त झाले.
पहिल्या फेरीतील सामन्यात 33 वर्षीय अँडी मरेने टिफोईचा 7-6 (8-6), 3-6, 6-1 असा पराभव करत दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला. 2020 च्या टेनिस हंगामातील मरेचा हा पहिला सामना होता. दुसऱया फेरीत मरेची गाठ जर्मनीच्या पाचव्या मानांकित ऍलेक्झांडर व्हेरेव्हशी पडणार आहे. अन्य एका सामन्यात कॅनडाच्या शेपोव्हॅलोव्हने क्रोएशियाच्या सिलीकचे आव्हान 6-3, 6-3 असे संपुष्टात आणले. कॅनडाच्या रेओनिकने अमेरिकेच्या क्वेरीचा 6-4, 6-4 असा पराभव करत विजयी सलामी दिली.
महिलांच्या विभागात ग्रीकच्या मारिया सॅकेरीने अमेरिकेच्या कोको गॉफचा 6-1, 6-3, ऍलेक्सड्रोव्हाने कझाकच्या रिबेकिनाचा 7-5, 7-6 (8-6), बेलारूसच्या अझारेंकाने क्रोएशियाच्या व्हेकीकचा 6-2, 6-3, अमेरिकेच्या ऍनीसिमोव्हाने आपल्याच देशाच्या रिसेकीचा 6-3, 6-3, युक्रेनच्या येस्ट्रेमेस्काने व्हिनस विलीयम्सचा 5-7, 6-2, 7-5 असा पराभव केला.