ऑनलाईन टीम / ब्रिटन :
ब्रिटनमध्ये कोरोना बाधितांची संख्या आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत चालली आहे, या पार्श्वभूमीवर ब्रिटनमधील लॉक डाऊन 1 जून पर्यंत वाढवण्यात आले आहे, अशी घोषणा ब्रिटन पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी रविवारी केली. याबरोबरच बोरिस यांनी नवीन मार्गदर्शक तत्वे देखील जारी केली आहेत.
यामध्ये त्यांनी सार्वजनिक स्थळे जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरू केली जातील असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेला पूर्ववत करण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय देखील घेतले आहेत.
बोरिस यांनी म्हटले की, जे लोक घरी बसून काम करू शकतात त्यांनी घरात बसूनच आपले काम सुरू ठेवावे. मात्र, ज्यांना बाहेर जावून काम करण्याशिवाय पर्याय नाही, त्यांना बाहेर जाण्यास परवानगी दिली जात आहे.
तसेच बोरिस यांनी लोकांना घराबाहेर किंवा घराजवळील उद्यानात जाऊन व्यायाम करण्यास तथा लहान मुलांना बागेत खेळण्याची देखील सूट दिली आहे. मात्र घरातून बाहेर पडताना मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे.
याबरोबरच शहरातील प्रायमरी स्कूल परिस्थिती पाहून 1 जून पासून सुरु केल्या जातील. तसेच 1जुलै पासून दुकाने आणि हॉटेल सुरू करण्याचा विचार आहे असे ही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, ब्रिटनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 2 लाख पेक्षा अधिक असून आतापर्यंत 31 हजार पेक्षा अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे.