हिथ्रो विमानतळावर आयर्लंडला जाऊ पाहणाऱयांची गर्दी
मागील वर्षी चीनच्या वुहानमध्ये कोरोना उद्रेक झाल्यावर तेथून लोकांना बाहेर काढण्याची घाई दिसून आली होती. यावेळी मात्र ब्रिटनमध्ये असा प्रकार घडत आहे. रविवारी रात्री उशिरा लंडनच्या हिथ्रो विमानतळावर डबलिन (आयर्लंड) येथे जाऊ पाहणाऱयांची मोठी गर्दी झाली. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी कोब्रा इमर्जन्सी कमिटीसोबत बैठक घेत अनेक देशांनी घातलेल्या बंदीवर चर्चा केली आहे.
मध्यरात्रीपासून प्रवासबंदी लागू करण्याच्या अनेक देशांच्या घोषणेनंतर हिथ्रोच्या टर्मिनल-5 वर लोकांची गर्दी झाली आहे. ब्रिटिश एअरवेजच्या फ्लाइटसाठी अतिरिक्त नोंदणी झाल्याने अनेक जणांना जाता आलेले नाही.
हिथ्रो विमानतळ प्रशासनाने समाजमाध्यमांद्वारे सर्व प्रवाशांना फ्लाइटची स्थिती आणि प्रवासविषयक सूचना पडताळून पाहण्याचे आवाहन केले होते. शेकडोंच्या संख्येत प्रवासी विमानतळावर पोहोचले होते, अशी माहिती विमानतळावरील कर्मचाऱयांनी सांगितले आहे.
हिथ्रोवर झालेल्या गर्दीवरून समाजमाध्यम वापरकर्त्यांनी लोकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. नाताळ तोंडावर असतानाही प्रवास करण्याचा काय लाभ? प्रवास केल्यास 10 दिवसांचे आयसोलेशन करावे लागणार असल्याने प्रवासबंदी असणे आवश्यक असल्याचे एका वापरकर्त्याने म्हटले आहे.