हिंसेकरता चिथावणी देणे वाहिनीच्या अंगलट
लंडन
ब्रिटनमध्ये हिंसक चित्रफितींचे थेट प्रसारण करून शिखांना चिथावल्याच्या आरोपाखाली खलिस्तानी वाहिनी खालसा टीव्हीवर 50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ब्रिटनच्या प्रसारमाध्यमांवर देखरेख ठेवणारी संस्था ऑफकॉमने खालसा टीव्हीला हिंसेसाठी चिथावणी देणे आणि नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी दोषी ठरवत ही कारवाई केली आहे. सांगितिक चित्रफित ‘बग्गा अँड शेरा’चे गाणे जुलै 2018 मध्ये प्रसारित करण्यात आले होते. यात भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचे आक्षेपार्ह छायाचित्र दाखविण्यात आले होते. तसेच चित्रफितीत दिल्लीतील लाल किल्ला पेटताना दाखविण्यात आला होता.
भारताविरोधात चिथावणीचा आरोप
भारतात शिख धर्मावर टीका करणाऱयांच्या विरोधात हिंसाचार करणे आणि प्रतिबंधित संघटना खलिस्तान लिबरेशन प्रंटला समर्थन करण्यासाठी लोकांना चिथावणी देणारा कार्यक्रम प्रसारित केल्याप्रकरणी खालसा टीव्ही दोषी आढळल्याचे ऑफकॉमने म्हटले आहे. ब्रिटनमध्ये खालसा टीव्हीला शिखांशी संबंधित मुद्दय़ांवरील कार्यक्रम प्रसारित करण्याचा परवाना आहे.